राणे पिता-पुत्र दोघांची पोलीस कोठडी आवश्यक, पोलिसांची न्यायालयात माहिती

मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात दिशा सालियनच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार राणे पिता-पुत्रांची काही दिवसांपूर्वी 4 तास चौकशी करण्यात आली होती. मात्र राणे यांच्याकडून कुठलीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. राणे पितापुत्रांनी कोणत्या आधारावर आरोप केले आहेत, त्यांच्याकडे काय सबळ पुरावे आहे, ते सादर करण्याचे सांगितल्यानंतर देखील त्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत. एवढेच नव्हे तर राणे पिता-पुत्राने उडवा उडवीचे उत्तर दिलंय.

दोन्ही आरोपी पुरावे नष्ट करू शकतात, दोघेही चौकशीत सहकार्य करत नसल्याचे देखील पोलिसांकडून आपल्या उत्तरात न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या सर्व प्रकरणाची माहिती घेण्याकरीता, चौकशी करण्याकरीता राणे पिता-पुत्र दोघांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून दिंडोशी सत्र न्यायालयात देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात दिशा सालियनच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करण्याकरीता पिता पुत्रांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र नारायण राणे यांनी चौकशीला उपस्थित राहण्याकरीता अधिक वेळ मागून घेतला होता. त्यानंतर नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाकरीता धाव घेतली आहे. या अर्जावर आज दिंडोशी कोर्टात सुनावणी झाल. कोर्टाने नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर 15 मार्चपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मालवणी पोलीस ह्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सदर याचिकेत राजकीय हेतूने आपल्या विरोधात गुन्हा नोंदवला गेल्याचे राणे यांनी म्हटलं गेलं आहे. 19 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे पिता पुत्रांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भाष्य केले होते. ज्या विरोधात सालियनच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सदर याचिकेवर मुंबई हायकोर्टात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.