आज दि.५ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राज ठाकरे द्वेष माजवण्याचे काम
करीत आहेत : रामदास आठवले

जोपर्यंत मशिदीवरील भोंगे बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे हे सातत्याने त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे काम करीत आहेत. भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्यासंबंधातील भूमिकेशी आपण अजिबात सहमत नाही,” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

महाराष्ट्रातल्या आर्या तावरेला मिळाले
‘फोर्ब्ज’ या मासिकात स्थान

मूळची बारामतीकर असलेल्या आर्याने हिने जगभरात नावाजलेल्या ‘फोर्ब्ज’ या मासिकात स्थान मिळविले आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील 30 वर्षांखालील 30 प्रभावशाली व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. त्यात आर्याला स्थान मिळाले आहे. लंडन युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडल्यावर आर्या तावरे हिने वयाच्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा व्यवसाय होता. तिच्या या कामाची दखल ‘फोर्ब्ज’ मासिकाने घेतली आहे.

आमदार जिग्नेश मेवाणी यांना
गुजरात न्यायालयाने ठरवले दोषी

गुजरात न्यायालयाने आमदार जिग्नेश मेवाणी यांना एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे आता त्यांना तीन महिने जेलमध्येच काढावे लागणार आहे. 2017 मध्ये ‘आझादी मोर्चा’ काढल्याबद्दल तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे. गुजरातमधील मेहसाणा येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज गुरुवारी अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना 2017 मध्ये परवानगीशिवाय ‘आझादी मोर्चा’ काढल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच प्रकरणात मेवाणी यांच्याशिवाय नऊ जणांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा
यांची भायखळा कारागृहातून सुटका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर, तुरुंगात गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं काल(बुधवार) जामीन मंजूर केला. आज खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यामांना कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले, केवळ हात जोडून त्यांनी नमस्कार केला. तर, त्यांचे पती आमदार रवी राणा हे तळोजा कारागृहात असून त्यांच्या सुटकेची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे.

हात जोडून माफी मागत नाही, तोपर्यंत
राज ठाकरे यांना आयोध्यात प्रवेश नाही

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा संबंध नाही, असेही शरण सिंह म्हणाले. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

शस्त्रसाठासह दहशतवाद्यांना हरियाणात
अटक, महाराष्ट्र कनेक्शन समोर

हरियाणा पोलिसांना दहशतवादाविरोधात मोठे यश मिळाले आहे. कर्नालमध्ये पोलिसांनी चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. एएनआय वृत्तानुसार, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादी काही मोठी घटना घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये गोळ्या आणि गनपावडर कंटेनरचा समावेश आहे. चौघांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास बस्तारा टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली.

अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर
मारायला पाहिजे : रितेश देशमुख

चार जणांनी बलात्कार केल्याच्या गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाणेदारानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुखने याप्रकरणी ट्विट केले आहे. तो म्हणाला, “जर हे खरं असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. जर रक्षकच भक्षक झाला तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जायचे? अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत कठोरात कठोर शिक्षा द्या”, अशी मागणी रितेशने केली आहे.

इस्रो पाठवणार
शुक्रावर अंतराळयान

चंद्र आणि मंगळावर यान पाठवल्यानंतर, सौर मालिकेतील सर्वात उष्ण ग्रह असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय दडले आहे हे पाहण्यासाठी त्याच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी अंतराळयान पाठवण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) करत आहे. शुक्राला वेढून असलेल्या गंधकयुक्त आम्लयुक्त (सल्फ्युरिक अ‍ॅसिड) ढगांखालील रहस्यांचा शोध घेणे हा ही या मोहिमेचा उद्देश आहे. शुक्र मोहिमेवर विचार झालेला आहे, तिचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे व तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे ‘शुक्र विज्ञानावरील’ एक दिवसाच्या बैठकीला संबोधित करताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.

अमित शाह ‘दादा’च्या घरी, गांगुलीचा लवकरच भाजप प्रवेश? 2021 मध्ये झालं नाही ते 2024 मध्ये होणार!

पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरी जाण्याची शक्यता आहे. अमित शाह हे सध्या तीन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. शुक्रवार 6 मे रोजी संध्याकाळी 7.10 वाजण्याच्या सुमारास शाह गांगुलीच्या घरी जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये संध्याकाळी 6 वाजता अमित शाह एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, या कार्यक्रमात सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीही सादरीकरण करणार आहे. कार्यक्रमानंतर डोना अमित शाह यांना घेऊन घरी जाईल, तसंच घरी सौरव गांगुली आणि अमित शाह रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेतील, असं सांगितलं जात आहे.

”अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…”, अजित पवारांचा इशारा

अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, असा इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंनी राज्य सरकारला 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यात काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण केलं. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही केली. पण काल राज्यभरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

SD social media
98 50 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.