राज्यातील काही भागात हुडहुडी भरलेली असताना आता पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे कोकण ,गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुणे हवामान वेधशाळेना तसा अंदाज वर्तविला आहे. आगामी काही दिवसांत पालघर, ठाणे तसेच मुंबई या जिल्ह्यांतही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात पुढील पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे. राज्याच्या काही भागात सध्या कडाक्याची तसेच मध्यम स्वरुपाची थंडी आहे. काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी जाणवत आहे. यातच आता आगामी पाच दिवसांत राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात आज वादळी वारा, तसेच विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आागामी तीन दिवसांत येथील वातावरण कोरडे राहील.
तर दुसरीकडे आज पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतही मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस येथील हवामान कोरडे राहील. नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात सध्या हलक्या स्वरुपात धुके दाटलेले आहे. 9 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.