शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, अनेकदा याबाबत मोठा हलगर्जीपणा झाल्याचं समोर येत असतं. अशीच आणखी एक धक्कादायक घटना गोंदियामधून समोर आली आहे. जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या अंजोरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पुरविण्यात येणाऱ्या शिजवलेल्या भातात चक्क अळ्या आणि सोंडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी अन्न बाहेर टाकलं. अन्यथा या अन्नामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असती आणि जीव धोक्यात आले असते. या घटनेनंतर शाळेतील या प्रकाराबद्दल पालकांनीही संताप व्यक्त केला. पालक वर्गाने शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने माध्यान्ह भोजन देणं सुरू केलं आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याची शासनाची योजना आहे. हा पोषण आहार शाळांमध्येच शिजविला जात जातो. शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली काही महिलांच्या हातून हे अन्न शिजविलं जातं.
अंजोर येथील शाळेत मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना भोजन वाटप केलं जात असताना विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहारात चक्क अळ्या आणि सोंडे दिसले. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांनी संपूर्ण अन्न बाहेर टाकून दिलं. याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला आहे.