कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे. शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकान बंद करायला भाग पाडले आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच तापले आहेत. कोल्हापुरातील वातावरण सध्या तणावाचे आहे.
फक्त कोल्हापुरातच नाही तर बेळगावतही अनेकजण आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले, महाराष्ट्र एकिकरण समिती रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले, यावेळी त्यांनी कर्नाटकचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही विकृती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर याबाबत सरकारने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारशी बोलणी करावी असेही ते म्हणाले आहेत. बेळगावातही लोकांनी कानडी लोकांची दुकाने बंद केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. त्यानंतर बेळगावमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.