आज दि.१७ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

२७ टक्के अनारक्षित जागांसाठी
१८ जानेवारीला मतदान

आयोगाच्या आधीच्या कार्यक्रमानुसार मतदानाची तारीख २१ डिसेंबर ठरली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. आता आधीच्या रचनेप्रमाणे ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर रोजीच मतदान होईल. मात्र, ज्या जागांवर ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं होतं, त्या २७ टक्के जागा आता अनारक्षित म्हणून जाहीर करण्यात आल्या असून त्या जागांसाठी पुढील महिन्यात अर्थात १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. महानगरपालिकांतील ४ रिक्त पदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते.

मोदी सरकारचे निर्णय चुकले असतील,
मात्र भावना मात्र स्वच्छ होती : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, मात्र त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती असं म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) ९४ व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. देशातील १३० कोटी लोकांचा लोकशाहीवरील विश्वास अजून वाढला आहे हेच मोदी सरकारचं सर्वा मोठं यश असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा
कायद्या अंतर्गत कारवाई

एसटी ही राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. एसटी संपाचा मोठा फटका हा राज्यातील ग्रामीण भागाला बसला असून आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा तोटा संपामुळे वाढत चालला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई प्रत्यक्ष सुरु करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. राज्यातील एसटीच्या विविध आगारांमधे कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.

निधीवाटपात शिवसेना तिसऱ्या स्थानी,
राष्ट्रवादी काँग्रेस अव्वलस्थानी

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसही शिवसेनेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी आहे. तर अर्थ खाते असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याकडूनही ४२० कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त तीन टक्के म्हणजे १४ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या खात्याची ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या अन्य मंत्र्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे
आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरा त्यांनी अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला
केंद्र सरकारची तत्वतः मान्यता

जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. राज्यसभेत लेखी उत्तरात अणु ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सध्या तांत्रिक-व्यावसायिक स्तरावर फ्रान्स सरकारच्या ईडीएफ या विभागाशी चर्चा सुरु असल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या देशामध्ये अणुऊर्जेपासून ६ हजार ७८० मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते. देशाच्या एकुण वीज निर्मितीच्या तुलनेत हा वाटा ३.१ टक्के एवढा अल्प आहे.

इस्लामफोबियाविरोधात
लढण्यासाठी विधेयक पारित

अमेरिकेच्या संसदेत इस्लामफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं. यावर संसदेत मतदान झालं. यात २१९ खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवत कायदा करण्याच्या बाजूने मतदान केलं, तर २१२ खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. विधेयकाच्या मंजुरीवर बहुमत झाल्यानं हा कायदा अमेरिकेच्या संसदेत मंजूर झाला. आता कायद्यात रुपांतरीत होण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळणं आवश्यक असणार आहे.

उत्तर कोरियात ११ दिवस
हसण्यावर बंदी

उत्तर कोरियात हुकूमशाह किम जोंग उनची सत्ता असल्याने लोकांना कोणते आदेश पाळावे लागतील सांगता येत नाही. रोज नवा आदेश देत लोकांवर करडी नजर ठेवली जात आहे. आता माजी नेते किम जोंग इल यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियात शोक पाळण्यात येत आहे. त्यामुळे जनतेवर ११ दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. या काळात देशातील जनता हसू शकत नाही, खूश होऊ शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. किम जोंग इल यांच्या निधनाच्या स्मरणार्थ लोकांनी आनंद व्यक्त करू नये, असे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कुमार
यांनी मागितली माफी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. विधानसभेत बलात्कारासंबंधी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. बलात्कार थांबवू शकत नसाल तर झोपा आणि मजा करा असा उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. यादरम्यान रमेश कुमार यांनी अखेर माफी मागितली आहे.

तरुणाने सापाला घेऊन दोरीउड्या
मारल्याची धक्कादायक घटना

सध्या सोशल मीडियावर काहीतरी हटके व्हिडीओ टाकून तो व्हायरल करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. मग यातूनच अनेकदा जीव धोक्यात घालून सीमा ओलांडल्या जातात. दरम्यान असाच काहीसा एक प्रकार पालघरमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने चक्क सापाला हातात घेऊन दोरीउड्या मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.