दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. दिवाळीचे अभ्यंगस्नान केल्याबरोबर देवदर्शनाला बरेचसे जण बाहेर पडत असतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील दिवाळीनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दोन वर्ष कोरोनामुळे कोणत्याही मंदिरात भक्तांना प्रवेश नव्हता. त्यामुळे सर्व सण उत्सवांच्या काळात भक्तांना घरातूनच देवाला प्रार्थना करावी लागत होती. पण आता कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे सगळेच सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होत आहेत. त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनासाठी दिवाळीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक दैवत आहे. माहुर, कोल्हापूर, तुळजापूर आणि वणी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं आहेत. नवरात्र उत्सवावेळी अंबाबाईची 9 दिवस वेगवेगवेळ्या रूपांमध्ये पूजा बांधली जाते. त्यामुळे देवीचं रूप आणखी खुलून आणि अधिक मनोहरी दिसतं. यावेळी कोरोनानंतरची यंदाची दिवाळी ही निर्बंध मुक्त साजरी होत आहे. त्यामुळे मंदिरात गर्दी बघायला मिळाली.
एकदा देवीचे रूप नजरेस पडले की मग आपला सण आणि येणारे वर्ष हे आपल्याला सुखकर जाईल, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि आजूबाजूच्या परिसरातून त्याचबरोबर कर्नाटकातून देखील भाविक या ठिकाणी आले होते. त्यातच लक्ष्मीपूजन असल्यामुळे देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, असं पुजारी प्रसाद मुनिश्र्वर यांनी सांगितले.
दिवाळीच्या दिवशी गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी नियोजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले होते. अंबाबाई मंदिरातील गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी नेटके नियोजन केले गेले होते. त्यामुळे अगदी कमी वेळात जास्त भाविकांना दर्शन घेणे शक्य झाले. दर्शन झाल्यानंतर लगेच दक्षिण दरवाज्यातून बाहेर जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिलेला असल्यामुळे गर्दी आटोक्यात राहण्यास मदत झाली.