आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप महायुतीची जोरदार चर्चा रंगली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीचे संकेतच दिले आहे. तर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी राजू पाटील यांचे आभार मानत मुख्यमंत्री शिंदेच याबद्दल अंतिम निर्णय घेतली, असं स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या विरोधकांना एकत्र करण्याचे काम भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू आहे. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी वाढलेली जवळीकता आणि त्यांच्यातील युतीची चर्चा यावरून मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तिन्ही नेते एकत्र आले होते. या महायुतीच्या चर्चेवर केसरकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
परस्परांना सहकार्य करण्याचे राजू पाटील यांच्या वक्तव्याचे आभार आहे. राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिले असले तरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत मी बोलणार नाही. एकत्र येऊन काम करणे ही काळजी गरज आहे. आम्हाला मुंबईकरांचे जीवन सुखी करायचे आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे करायचं आहे, ते सर्वांनी येऊन एकत्र केलं पाहिजे. असं मला स्वत: ला वाटतं. प्रत्यक्षात युती होणं आणि न होणं हा वेगळा भाग असतो, असंही केसरकर म्हणाले.
काय म्हणाले होते राजू पाटील?
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले की, काही गोष्टी या राजकारण सोडून बघितलं पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर जवळ येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झालाच नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात आले’ असे आमदार पाटील म्हणाले.
मागण्याचा सकारात्मक विचार होत असल्याने आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही असा अर्थ काढू नये. कारण माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही काही हरकत नाही. कारण सध्या ज्या युत्या, आघाड्या होतात त्यामध्ये कोणाकडेच काही बोलायला राहिलं नाही. मग आम्ही आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही त्याला तयार असू, आणि इतरांची पण काही हरकत नसावी, असंही राजू पाटील म्हणाले.