औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारणार

ओमिक्रॉनचे (Omicron) घोंगावणारे संकट लक्षात घेता, औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंगची अद्ययावत लॅब असणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणि प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची ओमिक्रॉनची टेस्टही करणे आवश्यक आहे. कोरोना बाधित व्यक्तीला ओमिक्रॉन या कोरोनाच्या विशिष्ट व्हेरिएंटची बाधा झाली आहे का, हे पाहण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅबद्वारे चाचणी करण्यात येते. मात्र महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि पुणे याठिकाणीच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आहेत. त्यामुळे या दोन लॅबवरच खूप ताण असल्याने रुग्णांचे अहवाल येण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते.
या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरु करण्याचे प्रयत्न जिल्हा आणि राज्य स्तरावरून सुरु आहेत. दरम्यान, अशी अद्ययावत लॅब विद्यापीठात सुरु होईल की घाटी रुग्णालयात यासंबंधीचा निर्णय येत्या तीन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

शहरात जिनोम सिक्वेन्सिंग लॅबसाठी दोन पर्याय आहेत. घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज ची प्रयोगशाळा. या दोन्हीपैकी एका केंद्रावर जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी सुविधा सुरु करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. याची चाचपणी करण्यासाठी प्रशासनाने एक समितीही स्थापन केली आहे. डॉ. वर्षा रोटे, विद्यापीठातील सदर प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पुढील तीन दिवसात अहवाल देईल आणि त्यानंतर लॅबची जागा निश्चित होईल.

विद्यापीठातील डीएनए बार कोडिंग आणि बायोडायव्हर्सिटी स्टडीज सेंटरमध्ये 2017 पासूनच अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहे. येथे सुमारे चार कोटींच्या मशीन्स आहेत. येथे आधी डॉल्फिन ब्लाइंड स्नेक, नोवासिक, देवणी, आहेर, मांगूर, कटला, रोहू आदी जीवांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. शिवाय ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांच्या ट्यूमरवरदेखील संशोधन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही डेल्टा प्लसचे जिनोम सिक्वेन्सिंग करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामुळे याच प्रयोगशाळेला समितीचा कौल मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.