पुण्यात गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत नियमांना धाब्यावर बसवलं गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यात रात्री दहा वाजेपर्यंतच स्पिकर-साऊंड, ढोल- ताशा वाजवायला परवानगी आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी कोथरूडमध्ये रात्री साडेदहानंतरही ढोल ताशे स्पिकर-साऊंड सुरू होते. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मंडळाला भेट द्यायला देवेंद्र फडणवीस आले होते.
फडणवीस यांच्या स्वागतासाठी स्पिकर आणि ढोल ताशांचा आवाज सुरु होता. घटनास्थळी असलेल्या पोलिसांना याबाबत विचारले असता पोलिसांची ‘ नो कमेंट्स’ अशी दबावयुक्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला ढोल ताशांच्या निनाद करण्यात आला. मात्र, नियम धाब्यावर बसवले गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पोलिसांनीही यावर काहीही बोलणं टाळलं. मार्तंड मल्हारी गणेश मंडळाला देवेंद्र फडणवीस यांनी रात्री साडेदहा वाजता भेट दिली.
याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री श्रीमंत दगडूशेठ गणपतीचंही दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गणरायाची आरतीदेखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.