युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज अठरावा दिवस आहे. युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युद्धाच्या भीतीने आतापर्यंत तेरा लाखांपेक्षा अधिक युक्रेनियन नागरिकांनी स्थलांतर केल्याने शहरे ओस पडली आहेत. अजूनही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत.
अखेर आता युक्रेनने दोन पाऊले मागे येत रशियासोबत चर्चेची तयारी दाखवली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यांशी जेरुसलेममध्ये चर्चेसाठी तयार असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तसा प्रस्ताव युक्रेनकडून रशियाला देण्यात आला आहे. दरम्यान या चर्चेसाठी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करावी असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
सोबतच फ्रान्स आणि जर्मनीमधील प्रमुख नेत्यांना देखील युक्रेनने मदतीचे आवाहन केले आहे. मेलिटोपोलच्या महापौरांना रशियन सैनिकांनी बंदी बनवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी आम्हाला मदत करावी असे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र संघाचे लक्ष असून, युक्रेन आणि रशियात मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे युक्रेनला आम्ही हवी ती मदत देऊ असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने युक्रेनला संरक्षणासाठी 13.6 डॉलरची मदत देण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ले करू नयेत, युद्धबंदीची घोषणा करावी अशी मागणी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र युद्धाच्या सुरुवातीपासूनच करत आहेत. मात्र रशियाने या दबावाला दाद न देता युद्ध सुरूच ठेवल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी युक्रेनवर कडक निर्बंध घातले आहेत. या आर्थिक निर्बंधांचा मोठा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसत आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र निर्बंधामुळे पुरवाठा साखळी खंडीत झाल्याने कच्च्या तेलाच्या दराने केव्हाच शंभर डॉलर पार केले आहेत. कच्च्या तेलासह इतर वस्तुंच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे