देशभरात दर वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं सरकार आणि विविध संस्था कार्यक्रमांचं आयोजन करतात. या दिवशी महात्मा गांधी यांच्या विचारांचं स्मरण केलं जातं. आजच्या काळात खरं तर वाढदिवस साजरा करण्याची व्याख्या बदलली आहे. तसंच वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूपही बदललं आहे. महात्मा गांधी हयात असताना स्वतःचा वाढदिवस कसा साजरा करत असतील, वाढदिवशी ते काय करत असतील, असा प्रश्न कधी तरी मनात आला असेल.
देशभरातल्या गांधीवादी संस्थांची मातृसंस्था असलेल्या गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि गांधीवादी विचारवंत रामचंद्र राही यांनी दिलेल्या माहितीनुसार, `बहुतेक महात्मा गांधी वाढदिवस साजरा करत नसावेत. परंतु, नागरिक त्यांचा वाढदिवस साजरा करत. याबाबत सुमारे 100 वर्षांपूर्वी गांधीजींनी सांगितलेलं एक वाक्य मला आठवतं. 1918 मध्ये गांधीजी त्यांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या लोकांना म्हणाले होते, की मी वाढदिवस साजरा करण्यास पात्र आहे की नाही, याची चाचणी माझ्या मृत्यूनंतर होईल.
ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या स्मृतिस्थळी देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या उपस्थितीत प्रार्थना केली जाते. महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दिवशी `रघुपती राघव राजा राम` हे त्यांचं आवडतं भजन गायलं जातं. या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला जातो.
15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला. भारतात प्रार्थनासभा, तसंच विशेषतः नवी दिल्लीतल्या राजघाट इथं गांधीजींच्या पुतळ्याला फुलांची माळ अर्पण करून गांधी जयंती साजरी केली जाते.
`महात्मा गांधी हयात असताना, हा दिवस विशेष गंभीर असायचा. वाढदिवशी गांधीजी ईश्वराची प्रार्थना करत. चरखा चालवत. या दिवसातला बहुतांश काळ ते मौन बाळगायचे. कोणताही महत्त्वाचा दिवस ते याच पद्धतीनं साजरा करायचे,` असं रामचंद्र राही यांनी सांगितलं.