आता कोरडा दुष्काळ कायमचा विसरा; हवेपासून पाणी तयार करणारी मशीन लाँच; भारतातही होईल विक्री

देशातील पाण्याची समस्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बेभरवशाचा मान्सूनचा पाऊस, आणि सिंचनाच्या कमी सुविधा या कारणांमुळे दरवर्षी उन्हाळ्यात देशातील कित्येक नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं. मात्र यावर आता एक परिणामकारक उपाय समोर आला आहे. हवेपासून पाणी तयार करणारं मशीन आता भारतात लाँच झालं आहे. इस्रायली कंपनी ‘वॉटरजेन’ने एसएमव्ही जयपुरिया ग्रुपसोबत पार्टनरशिपमध्ये हे मशीन भारतात आणलं आहे. याचा फायदा नक्कीच देशातील नागरिकांना होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

असं करतं काम

पाणी म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन वायूंचं मिश्रण असतं. हे मशीन आर्द्रता असलेल्या हवेतून हेच दोन वायू घेऊन, त्यापासून पाणी तयार करते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे शाळा, हॉस्पिटल, घर, ऑफिस, हॉटेल, बांधकाम सुरू असलेली ठिकाणं, ग्रामीण भाग अशा बऱ्याच ठिकाणी हे मशीन  पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्याच्या कामी येईल.

वापरायला सोपं, किंमतही आवाक्यात

हे मशीन वापरण्यासाठी अगदी सोपं असेल. यासाठी तुम्हाला वेगळा कोणताही सेटअप करण्याची गरज भासणार नाही. केवळ वीजेच्या कनेक्शनला, किंवा एखाद्या अल्टर्नेटिव्ह एनर्जी सोर्सला कनेक्ट केल्यानंतर हे मशीन आपलं काम सुरू करेल. कंपनीने लाँच इव्हेंटच्या या मशीनचे विविध व्हेरियंट दाखवले. जेन्नी, जेन-एम1, जेन-एम प्रो आणि जेन-एल अशा विविध व्हेरियंटमध्ये हे मशीन उपलब्ध होईल. दिवसाला 30 लिटरपासून 6,000 लिटरपर्यंत पाणी तयार करणाची क्षमता असलेली ही मशीन्स आहेत. या मशीन्सच्या किंमतीबद्दल अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. तरी, याची किंमत साधारणपणे 2.5 लाख रुपये असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लवकरच भारतातही होणार निर्मिती

वॉटरजेन आणि जयपुरिया ग्रुप मिळून देशात अ‍ॅटमोस्फिअरिक वॉटर जनरेटर्स लाँच करणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत ते भारतातच या मशीनची निर्मिती करण्यास सुरूवात करतील. वॉटरजेन इंडियाचे सीईओ मायन मुल्ला यांनी सांगितलं, की देशातील सर्वांना सुरक्षित मिनरलाईज्ड पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे त्यांचं लक्ष्य आहे. वॉटरजेनची जीनियस ही पेटंट टेक्नॉलॉजी भारतातील इंडस्ट्रियल आणि कन्झ्युमर डिमांड उत्कृष्टपणे पूर्ण करू शकेल, असेही ते म्हणाले. तर एसएमव्ही जयपुरीया ग्रुपचे संचालक चैतन्य जयपुरिया यांनी ही टेक्नॉलॉजी देशातील पाणी प्रश्नावर गेम-चेंजिंग सोल्यूशन ठरेल असा दावा केला.

हवेपासून पाणी तयार करणारं हे मशीन कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे उपयुक्त ठरलं, तर देशातील बऱ्याच दुर्गम भागांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.