एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर इतिहासातलं सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. शिंदेंसोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार गेले, यानंतर आता 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
एकनाथ शिंदेंकडे जाणारा हा आमदार कोकणातील असल्याचंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. शिवसेनेकडे सध्या कोकणात 3 आमदार आहेत, यात राजन साळवी , वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे, यापैकीच एक आमदार पुढच्या 48 तासांमध्ये शिंदेंकडे असू शकतो.
कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला आहे, तर आमदार राजन साळवी हे रिफायनरी प्रकल्पासाठी अनुकूल आहेत. काहीच दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत हे कोकणात होते, तेव्हा त्यांनीही रिफायनरीबाबत अनुकूल अशीच भूमिका घेतली. प्रकल्पामुळे कोकणात रोजगारनिर्मिती होईल आणि कोकणाचा विकास होईल, असं सामंत म्हणाले होते.
सध्या महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे जवळपास सगळेच आमदार मुंबईमध्ये आहेत. कोकणातल्या शिवसेनेच्या 3 पैकी एका आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान आजच उदय सामंत यांनी घोषणाबाजी करणारे विरोधातले आमदार लवकरच शिंदेंकडे येणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं होतं.