पिकाची नोंद थेट शासन दरबारी; ’ई-पीक पाहणी’ 2.0 झाली अधिक सोपी

शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपची  निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतात जाऊन ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षीच्या अ‍ॅपमध्ये सुधारणा करून आता मोबाईल अ‍ॅप 2.0 खरीप हंगामातील पीक नोंदणीसाठी सज्ज झाले आहे.

पिकांची अचूक नोंद शासनाकडे करता यावी. या उद्देशाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलातून शेतकऱ्यांना हे अ‍ॅप अधिक सोपे आणि सहज लक्षात येईल असे बनवण्यात आले आहे. ई- पीक पाहणीचे नवीन सोपे व्हर्जन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीत दुरुस्ती देखील करता येणार आहे. खरीप हंगाम 2022-23 ची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वीच्या अ‍ॅपमध्ये शेतकऱ्यांच्या सूचनांच्या आधारे महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत असे मोबाईल अ‍ॅप 2.0  व्हर्जन विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

 48 तासांमध्ये एकदा दुरुस्ती

या महिन्यात अ‍ॅपद्वारे ई-पीक नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीक पाहणी नोंदवल्यापासून 48 तासांमध्ये त्यात स्वतःहून एकदा दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे.

तीन पिके नोंदविता येणार

यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा होती. मात्र, या सुधारित अ‍ॅपमध्ये एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांची नोंदणी करता येणार आहे. इतकेच नव्हे, तर या दुय्यम पिकाचा हंगाम, तारीख व पीक क्षेत्र यात नोंदविता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मदतीचे बटण

अ‍ॅपवरील मदत या बटनावर क्लिक केल्यास प्रश्न उत्तरे स्वरुपात माहिती उपलब्ध होणार आहे व हे बटण सहज हाताळता येणार आहे. यामुळे अ‍ॅपमधून शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे निवारण होणार आहे.

अ‍ॅप कसे डाऊनलोड कराल?

मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी अ‍ॅप 2.0 व्हर्जन डाऊनलोड करावे. खालील लिंक वरून अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN&gl=US 

शेतकऱ्यांनी अ‍ॅपच्या साहाय्याने पिकाची अचूक माहिती भरावी, पिकांची माहिती भरताना त्यात चूक झाल्यास पीक विमा व इतर सुविधांपासून शेतकरी वंचित राहू शकतात. सर्व शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन तहसीलदार राजेश सरवदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.