नैऋत्य मान्सून श्रीलंकेला पोहोचला असून तो आता केरळ किनाऱ्याच्या दिशेनं जात आहे. भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढच्या 48 तासांत मालदीव लक्षद्विपच्या आसपासच्या भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांत लक्षद्विप आणि केरळमध्ये व्यापक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आयएमडीने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून केरळच्या दिशेनं वाटचाल करत असताना त्याचे पूर्णपणे परीक्षण केलं जात आहे. साधारणत: पावसाळा केरळमध्ये 1 जून रोजी आला आहे, आता 4 दिवसांपूर्वी हे आगमन अपेक्षित आहे. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपूर्वी, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ असानी या चक्रीवादळामुळे नैऋत्य मान्सूनला वेग आला आहे.
हवामानशास्त्रीय विभागाने पुढील 3 ते 4 दिवस दिल्लीच्या तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यावेळी तापमान 41 डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या मते, जम्मू -काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथेही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.