आज दि.१० मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

कुतुबमिनारचं नाव बदलून
विष्णू स्तंभ करा : संघटनेची मागणी

दिल्लीतल्या कुतुब मिनार परिसरात हिंदू संघटनांनी हनुमान चालिसा आंदोलन केलं. कुतुब मिनारचं नाव बदलावं, अशी या संघटनांची मागणी आहे. हिदुत्ववादी संघटना युनायटेड हिंदू फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी आज कुतुब मिनारसमोर हनुमान चालिसा वाचली. कुतुबमिनारचं नाव बदलून विष्णू स्तंभ करावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कुतुब मीनार हा आधीचा विष्णू स्तंभ आहे. तसंच जैन आणि हिंदू मंदिरं तोडून कुतुबमिनार बांधण्यात आला, असा दावा या संघटनेनं केलाय.

संतूरवादक पंडित शिवकुमार
शर्मा यांचे निधन

संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या नावाजलेल्या संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जीवनाची कारकिर्द इथंच संपली. शर्मा यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाविश्वातून अनेकांनीच हळहळ व्यक्त केली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून त्यांना किडनीच्या त्रासानं ग्रासलं होतं. अखेरच्या सहा महिन्यांमध्ये ते डायलिसिसवरही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पं. शिवकुमार शर्मा यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहे. त्यांनी ट्वीट करत पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘पंडित शिवकुमार शर्मा जी यांच्या निधनाने आपले सांस्कृतिक जगाचे नुकसान झाले आहे. त्यांनी संतूर वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालत राहील. मला त्यांच्याशी झालेला संवाद आजही आठवतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती संवेदना.’

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान
राजपक्षे यांना नौदल तळावर हलवले

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेलिकॉप्टरमधून नौदल तळावर हलवण्यात आले आहे. श्रीलंकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यापासून देशात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिक संतप्त झाले असून त्यांनी एका खासदाराचे घर पेटवून दिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अडीच महिन्याचा कालावधी द्यावा लागेल

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय पक्षांची निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. काही पक्षांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा अवधी लागेल, असं स्पष्ट केलं आहे. तसेच कोर्टानं नेमकं काय सांगितलं आहे, याबाबतही पत्रकार परिषदेत सांगितलं.

राज ठाकरे हिंदू नेता नहीं खलनायक
है : खासदार बृजभूषण सिंह

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांना डिवचलं आहे. ‘राज ठाकरे हिंदू नेता नहीं खलनायक है, कोई दबंग नेता नहीं, चुहा है चुहा,’ अशा शब्दांत खासदार सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बृजभूषण सिंह यांनी आज नंदिनी नगर परिसरात राज ठाकरे यांच्या विरोधात रॅली काढत शक्तीप्रदर्शनही केलं. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर पुन्हा हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही.

जो खड्डा खणतो तोच त्यात
पडतो : जितेंद्र आव्हाड

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला एकीकडे तीव्र विरोध होत असताना त्यांनी घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. स्वत: माणूस जेव्हा मातीत खड्डे खणतो, तेव्हा तोच खड्ड्यात पडतो. सर्वात जास्त नुकसान हिंदू समाजाचं झालं. धर्मा-धर्मात भांडणं लावून झाली. ते जमलं नाही. आता जाती-जातीत भांडणं लावतील”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

जनगणनेची प्रक्रिया डिजिटल
होणार : अमित शहा

करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वात महाग हाँगकाँगमध्ये तर
स्वस्त पेट्रोल मिळते व्हेनेझुएलामध्ये

जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल १७५ हून अधिक रुपये मोजावे लागतात. सर्वात महागडं पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक दुसऱ्या स्थानी आहे. येथे पेट्रोल १५० रुपये प्रती लिटरहून अधिक महाग मिळते. नेदरलॅण्डमध्येही पेट्रोल महाग आहे. येथेही साधारण १५० रुपयांच्या आसपास पेट्रोलचे दर आहेत. महागडे पेट्रोल मिळणाऱ्या देशांमध्ये नॉर्वे आणि ग्रीसचाही समावेश होतो. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. येथे एक लिटर पेट्रोलसाठी १.७ रुपये मोजावे लागतात. दक्षिण अमेरिका खंडातील या देशात मुबलक तेलसाठे आहेत.

संवाद तुटला की माणसांत गैरसमज
निर्माण होतात : नागराज मंजुळे

संवाद तुटला की माणसांत गैरसमज निर्माण होतात. माणसे दूर होत गेली की राक्षस तयार होतात. त्यामुळे वेगवेगळय़ा माणसांतील संवाद वाढला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सैराट’ फेम सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे यांनी केले. ते म्हणाले, समाजव्यवस्थेमध्ये आग लावणारा नव्हे तर आग विझवणारा महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपण आग लावणाऱ्या समूहात नव्हतो असे विचार महत्त्वाचे आहेत. दलित आदिवासी भटके विमुक्त कष्टकरी बहुजनांच्या मुक्तिदायी राजकारणाच्या बाजूने संस्कृती जनवादी साहित्य संस्कृती संमेलन सावंतवाडीच्या उद्घाटनप्रसंगी नागराज बोलत होते.

‘आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरे यांच्या सहीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांविरोधात सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईवरुन मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. “राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची याआधीचे पत्र हे विनंती करणारे आणि मागणी मांडणारे होते. पण यावेळी त्यांनी पत्रातून थेट इशारा दिला आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे यांची स्वाक्षरीदेखील आहे.

‘नवी दिशा, नवा पर्याय…’, संभाजीराजेंचा भाजपला रामराम? 12 मे रोजी मोठी घोषणा

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आता लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संभाजीराजे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज सकाळीच संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

सापाची हत्या करुन WhatsApp Status वर ठेवला फोटो; तरुणांच्या अंगाशी आलं प्रकरण

नागपूरच्या नरखेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलाने धामण प्रजातीच्या सापाची हत्या करून त्याचे फोटो व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले होते. हा प्रकार या तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी, राहुल रेवतकर आणि त्याचा मित्र प्रविण मोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वनविभागाने केली आहे.

रुपयाची ऐतिहासिक घसरण, 2008 च्या तुलनेत अर्ध्या किंमतीवर

देश-विदेशातील प्रतिकूल घटनांच्या एकत्रित परिणामाने डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. प्रति डॉलर आणखी 60 पैशांच्या घसरगुंडीसह रुपयाचं मूल्य इतिहासात प्रथमच 77.50 वर जाऊन पोहोचलं आहे. विदेशी बाजारांमधून मिळणाऱ्या काही संकेतांमुळे रुपया कमजोर झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धासह रिझर्व बँक महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरांमध्ये वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे डॉलर वधारला आहे. शिवाय, चीनमधील कोरोना टाळेबंदी आणि तिचे मंदीसदृश आर्थिक परिणाम पाहायाला मिळत आहेत. 2008 साली एका डॉलरसाठी 43 रुपये मोजावे लागत होते. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत रुपयाच्याही खाली जाऊन पोहोचला आहे. यामुळे रुपयाची किंमत 0.02325 डॉलर वरून घटून 0.01298 डॉलरवर पोहोचली आहे. या स्थितीचा परिणाम भारतासह जगभरातील सर्वच चलनांवरती पाहायला मिळत आहे भारतासारख्या आयात मोठ्या प्रमाणात करणाऱ्या देशांसाठी देशाच्या चलनामध्ये झालेली ही घट अतिशय चिंतेची बाब आहे. कारण, यामुळे देशाला काहीही आयात करताना जास्त प्रमाणात किंमत अदा करावी लागेल आणि आयात महाग होईल. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, रुपया पुढील काळात आणखी कोसळण्याची शक्यता आहे ही बाब चिंतेची आहे. यामुळं डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी एक नीचांक प्रस्थापित करू शकतो.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.