राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेकांनी राज्यपालांच्या विरोधात रस्त्यावर उतरत त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे. अशात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेच राज्यपालांना पदावरुन दूर करावं, अशी मागणी केली आहे.
याबाबत उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं की ‘छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तंजावरपासून अफगाणिस्तानपर्ययंत स्वराज्याचा विस्तार केला. महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत.
गेल्या काही वर्षांपासून शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केलं जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तींकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाबा अतिशय दुर्दैवी आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
20 नोव्हेंबर रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राने समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिलं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आणि दुसरं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचं आहे. त्यांची ही वक्तव्यं निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच. पण यापूर्वीही त्यांनी काही विधानं करत महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा जनमानसांतून निषेध होऊनही ते बदलायला तयार नाहीत. त्यांची महाराष्ट्रात अडीच वर्ष कारकिर्द होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत, ही बाब दुर्दैवी आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांना तातडीने पदावरुन दूर करा, अशी तमाम जनतेची मागणी आहे. आपण यावर योग्य ती कार्यवाही कराल याची मला खात्री आहे.’ असं आपल्या निवेदनात म्हणत उदयनराजेंनी मोठी मागणी केली आहे. उदयनराजेंच्या या मागणीबाबत आता काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.