पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. नेतृत्वाने आतापर्यंत मंथन करायला हवं होतं. चिंतन वगैरे त्यांच्या मनात झालं पाहिजे होतं. आता नव्या नेतृत्वाला नेतृत्व करण्याची परवानगी द्यायला पाहिजे. सुनील गावसकर यांना एक दिवस निवृत्त व्हावं लागलं होतं.
इथे आपण गावसकर यांच्यासोबत काम करतन नाहीये. सचिन तेंडुलकरलाही संन्यास घ्यावा लागला. कालपरवापर्यंत विराट कोहली संघाचा कर्णधार होता. तिघांचेही नावं क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जातील. त्यांनाही संन्यास घ्यावा लागला. बाजूला व्हावं लागलं. आता जाण्याची वेळ आली आहे, असा विचार महान लोकही करत असतील तर आपणही जे पराभव पाहिलेत, त्यानंतर तरी नेतृत्वाने आपली जागा दुसऱ्यांना दिली पाहिजे. निवडून आलेला असेल किंवा नियुक्त केलेला असेल अशा व्यक्तीकडे नेतृत्वाची धुरा दिली पाहिजे. त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
कपिल सिब्बल यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. सोनिया गांधी या अध्यक्षा आहेत असं आपण मानतो. पण राहुल गांधी पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली.
त्यांनी ही घोषणा कोणत्या अधिकारात केली? ते पक्षाचे अध्यक्ष नाहीत. मात्र, तरीही ते पक्षाचे सर्व निर्णय घेत आहेत. ते आधीपासूनच पक्षाचे अप्रत्यक्ष अध्यक्ष आहेत, तर त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारावीत हे आपण का म्हणत आहोत? त्यांनी अध्यक्ष व्हावं म्हणूनच ना. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अध्यक्ष झाले तरी काय फरक पडतो?, असा सवाल सिब्बल यांनी विचारला आहे.
सीडब्ल्यूसीच्या बाहेरही एक काँग्रेस आहे. कृपया त्यांचे विचार ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तर… आमच्यासारखे अनेक नेते सीडब्ल्यूसीमध्ये नाहीयेत. मात्र काँग्रेसमध्ये पूर्णपणे एक वेगळा दृष्टीकोण आहे. त्याने काही फरक पडत नाही का? कारण आम्ही सीडब्ल्यूसीमध्ये नाही, देशभरात काँग्रेसी आहेत. केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशापासून गुजरातपर्यंत. पण त्यांचा दृष्टीकोण विचारात घेतला जात नाही, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे. तसेच गांधी परिवार कल्पनेत वावरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.