राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही पुणे जिल्ह्यातील परिस्थिती ही सातत्याने चिंताजनक राहिली आहे. अशातच आता पुण्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण, पुण्यातील 91 गावे सध्या कोरोना हॉटस्पॉट झाली आहेत. जुन्नर, आंबेगाव, दौंड या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉटस आहेत. तर खेड, मावळ, भोर आणि वेल्हे या चार तालुक्यांमध्ये एकही गाव कोरोना हॉटस्पॉट नाही. (91 Covid hotspots in Pune)

कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर पुणे जिल्ह्यात निर्बंधांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रिया विधींसाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होत आहे. सार्वजनिक ठिकाणीही लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसत नाहीत. याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार इशारे देण्यात आले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराही पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

जुन्नर आणि बारामतीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
जुन्नर आणि बारामती या तालुक्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जुन्नरमध्ये कोरोनाचे 25 हॉटस्पॉट आहेत तर बारामती तालुक्यातील 15 गावांना कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर आंबेगाव तालुक्यातील घोडेगावात सध्या सर्वाधिक 66 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. याशिवाय, मंचरमध्ये 57 आणि नारायणगावात 54 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

राज्यातील 26 टक्के सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात
पुणे (Pune) शहरात मागच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patients) चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाची दैनंदिन संख्या ही 97 पर्यंत खाली आलेली असताना दोनच दिवसांत एका दिवसांत आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 399 वर गेली होती. त्यात पुढचे काही दिवस हे सणासुदीचे असल्यानं बाजारपेठांमध्ये गर्दीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या कारणाने, प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात पुढच्या काही दिवसांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुण्यात आहेत. त्यांची टक्केवारी ही 26 टक्के आहे. 31 ऑगस्टपर्यंत राज्यात 51 हजार 238 सक्रिय कोरोना रुग्ण होते. त्यापैकी सुमारे 26 टक्के म्हणजे 13 हजार 515 सक्रिय रुग्ण हे एकट्या पुण्यात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.