शरद पवार यांच्या मध्यस्थीने एमपीएससी विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. 35 तासांहून अधिक वेळ या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं, यानंतर मुख्यमंत्र्यांसह बैठक करून देण्याचा शब्द शरद पवारांनी दिला. अर्धा तास शरद पवार आंदोलन स्थळी होते.
एमपीएससी करणारे हजारो विद्यार्थी बालगंधर्व चौकात होते. रात्री उशीरा शरद पवार यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांना आवाहन केलं, यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, आयोगाचे सदस्य आणि शरद पवार अशी बैठक होणार आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, याची मी जबाबदारी घेतो. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत हे कुलगुरू सांगत आहेत, याची नोंद सरकारला घ्यावी लागेल, असं शरद पवार म्हणाले. पवारांनी स्वत: फोनवरून मुख्यमंत्र्यांशी एमपीएससी आंदोलनकर्त्यांसोबत बोलणं करून दिलं. मुख्यमंत्र्यांनीही एमपीएससी मुख्य परिक्षेचा नवा वर्णनात्मक पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याचं पुन्हा आश्वासन दिलं, पण नोटिफिकेशन कधी निघणार? असा सवाल आंदोलक परीक्षार्थींनी विचारला आहे.