काँग्रेस पक्षनेतृत्वाचा प्रश्न
अद्याप सुटलेला नाहीच
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर आधी हंगामी आणि नंतर पूर्णवेळ असं अध्यक्षपद सोनिया गांधींकडे आलं. मात्र, त्यानंतर देखील काँग्रेस पक्षनेतृत्वाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पक्षातील जी-२३ गटानं नेतृत्वबदलाची भूमिका अनेकदा मांडली आहे. राहुल गांधी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या सुरू असताना त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद सांभाळलेले पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल
पोर्ट ब्लेअरमध्ये, तर महाग परभणीत
भारतातील एक असे शहर आहे जिथे पेट्रोलचे दर दिलासा देणारे आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जास्त वाढ केलेली नाही. सध्या भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत प्रति लिटर ९१.४५ रुपये आहे. दुसरीकडे, भारतातील सर्वात महाग पेट्रोल परभणी, महाराष्ट्र येथे विकले जात आहे जिथे किंमत १२३.४७ रुपये प्रति लिटर आहे. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, सोमवारी येथे एक लिटर पेट्रोलची किंमत १०५. ४१ रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोलची किंमत १२०.५१ रुपये प्रति लिटर आहे.
राज ठाकरे यांना विशेष
सुरक्षा पुरवली जाणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर त्यांना मागील काही दिवसांपासून धमकावलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याचा दावा केला जातोय. ‘एबीपी न्यूज’च्या सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार राज यांना पीएफआय या संघटनेकडून धकमावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
करा, असीम सरोदे यांची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी १२ तारखेला झालेल्या ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ईदपर्यंत म्हणजेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही तर आम्ही मशिदींसमोर भोंग्यावर तितक्याच आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू असा इशारा राज यांनी दिलाय. मात्र आता याच मागणीवरुन पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधलाय. इतकच नाही तर राज ठाकरे न्यायालयाने निकाल दिल्याचा खोटा दावा करत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असं आपलं वैयक्तिक मत असल्याचंही सरोदे यांनी म्हटलंय.
१ ते १४ मे दरम्यान अकरावीची
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
राज्यात दरवर्षी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतरच सुरू केली जाते. मात्र शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. १ ते १४ मे दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव करता येणार असून, १७ मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक या महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते.
लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी
आशिष मिश्राचा जामीन रद्द
लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपी असणारे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना मंजूर करण्यात आलेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. तसेच, आठवड्याभरात तुरुंगात पुन्हा परतण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आशिष मिश्रा यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर राखून ठेवलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन
बिघडले आहे : गिरीश महाजन
भाजपा आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल आहे, असं महाजन म्हणाले आहे. तसेच, राज्यात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या संकटावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली आहे. याशिवाय मशिंदींवर भोग्या संदर्भात देखील त्यांनी भाजपाची भूमिका मांडली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या दोन
खेळाडूंना करोनाची लागण
इंडियन प्रिमियरल लीग अर्थात आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजओ पॅट्रिक फरहार्ट करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता याच संघाच्या ताफ्यातील आणखी दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक परदेशी खेळाडू तर दुसरा सपोर्ट स्टाफचा सदस्य आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आता एकूण तिघांना करोनाची लागण झाली आहे. क्रिक इन्फोने याबाबत अधिक माहिती दिली आहे.
SD social media
9850 60 35 90