‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून 90 च्या दशकातील काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा विषय मांडण्यात आला आहे. एका गंभीर सामाजिक विषयावर ‘द काश्मीर फाईल्स’ मधून भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटावरुन सध्या वादविवाद सुरु आहेत. दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.
बॉक्स ऑफिसवरही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटांसदर्भात बोलण्यासाठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अनुपम खेर आणि पल्लवी जोशी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आले होते. तिथे त्यांनी काश्मिरी पंडितांशी संवाद साधला. मूळच्या काश्मिरी पंडितांशी संवाद साधताना अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्री यांना आपल्याा भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांच्या डोळ्य़ात अश्रू तरळले.
11 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर हा चित्रपट ट्रेडिंग आहे. या चित्रपटावर वेगवेगळी मत व्यक्त होत आहे. आज खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या चित्रपटावर भरभरुन बोलले.
“द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजतं. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात”, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केलं. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असंदेखील ते म्हणाले.
हा चित्रपट पाहून थिएटर बाहेर आल्यानंतर काश्मिरी पंडितांचे डोळे पाणावत आहेत. आपलं घर, भूमी सोडण्याचं दु:ख आजही त्यांच्या मनात कायम आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष काश्मिरी पंडितांशी संवाद साधताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर भावूक झाले. त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.