शेती हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारा देशातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. नैसर्गिक प्रतिकुलता, बदलती सरकारी धोरणं याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या अडचणीतून मार्ग काढत, नव्या बदलांशी, आधुनिकतेशी जुळवून घेणारी शेतकरी हे नेहमी यशस्वी होतात.
प्रादेशिक विकासाचा अनुशेष राहिल्यानं नेहमीच चर्चेत असलेला मराठवाड्यातील शेतकरी देखील आता हे बदल करण्यात यशस्वी ठरत आहे. जालनाच्या रेशीम मार्केटमध्ये हे बदल जाणवत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात जालन्याच्या रेशीम बाजारात तब्बल 38 कोटींची उलाढाल झाली आहे. तर तब्बल 418 क्विंटल रेशीम कोषांची विक्री झाली आहे.
21 एप्रिल 2018 मध्ये राज्यातील पहिली रेशीम बाजार पेठ तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने सुरू झाली. सध्या या रेशीम मार्केटमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा बोलबाला आहे. मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह शेजारच्या गुजरातमधील शेतरकरी देखील इथं रेशीम विक्रीसाठी येत आहेत.
या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना सरासरी 500 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळतोय. मागील महिन्यात 760 रुपये किलो इतका उच्चांकी भाव होता. रोज सरासरी 3 टन कोशांची बाजारात आवक होत आहे. रेशीम मार्केट सुरू झाल्यापासून आर्थिक उलाढालीचा आलेख दरवर्षा वाढताना पाहयला मिळतोय.
किती झाली उलाढाल?
1 एप्रिल 2020 -ते 31 मार्च 2021 या वर्षात 4872 शेतकऱ्यांन कडून 429 कोष खरेदीमधून 12 कोटींची उलाढाल झाली.1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यतच्या आर्थिक वर्षात एकूण 5200 शेतकऱ्यांकडून 462 टन कोषाची खरेदी झाली, ज्यातून 24 कोटींची उलाढाल झालीय. तर 1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यत चालू वर्ष संपण्याच्या एक महिना अगोदरच 8228 शेतकऱ्यांच्या 718 टन कोष खरेदी मधून तब्बल 38 कोटींची या ठिकाणी उलाढाल झाली आहे.
या वर्षातील जानेवारी-फेब्रुवारी या अवघ्या दोन महिन्यात 1200 शेतकऱ्यांन कडून 122 टन कोष खरेदी मधून -7 कोटी 23 लाखांची उलाढाल झालीय. मराठवाडा विदर्भातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जवळची आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने तुलनात्मकदृष्ट्या लागवड क्षेत्रात सुद्धा भर पडलीय, एकट्या जालना जिल्ह्यात मागील वर्षी 853 एकर वर रेशीम लागवड झाली होती त्यात आत भर पडून हे क्षेत्र 1400 एकरवर गेलंय.
सध्या सगळ्याच शेती मालाचे दर कमी झालेत. अनेक पिकांचे बाजारभाव घसरलेत,मात्र रेशीम उत्पादक शेतकऱ्याला मात्र सुगीचे दिवस आल्याच पाहायला मिळतेय, रेशीमचे भाव मागच्या महिन्यापेक्षा काहीसे कमी झाले असले तरी समाधानकारक असल्याने रेशीम उत्पादक शेतकरी सध्या आनंदी आहे.