नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव, ट्रक झाला पलटी, स्फोट होऊन रॉकेटसारखे उडाले सिलेंडर
नाशिक जिल्ह्यामध्ये आजचा दिवस आगीच्या घटनांचा दिवस ठरला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. एकापाठोपाठ स्फोटानंतर सिलेंडर आकाशात उडाले.गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर घडली. आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे.ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ काही सिलेंडर आकाशामध्ये उडाले.
दरम्यान,वणी गडावर धावत्या एसटी बसला आग लागली. सुदैवाने वेळीच प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या, त्यामुळे जीवितहानी झाली नाही.आज दुपारी नाशिकच्या वणी गडावर ही घटना घडली. नांदुरीहुन वनी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली. धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली.
दिवाळीनंतर पालकांच्या खिशाला लागणार कात्री; स्कूल बसच्या शुल्कात होणार वाढ
सीएनजीच्या दरात झालेल्या ताज्या वाढीनंतर, महाराष्ट्रातील स्कूल बस मालकांच्या संघटनेने दिवाळीनंतर भाडे 10 टक्क्यांनी वाढवण्याची योजना आखली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. प्रस्तावित दरवाढीमुळे मासिक भाडे किमान 200 रुपयांनी वाढेल. मध्य-वर्षाच्या बस शुल्क वाढीमुळे पालकांना पर्याय उरणार नाही.
नागपूरला हत्तीरोगाचा विळखा! पालिकेनं पहिल्यांदाच उचललं मोठं पाऊल
नागपूर शहरात पहिल्यांदा हत्तीरोग आजार पूर्ण विकसित झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहेत. यासाठी नागपूर महानगरपालिकेने मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग व्यवस्थापन कक्ष सुरू केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग कक्ष सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
ठाकरे गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे गटातील शिवसैनिकांनी ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांना अश्लिल इशारे केल्यानंतर या शिवसैनिकांना चोप देण्यात आला होता. यानंतर आता आणखी एक बातमी ठाण्यातून समोर आली आहे.आता ठाकरे गटातील शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाकरे गटातील 8 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.आक्षेपार्ह घोषणा दिल्याने ठाणे शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ठाणे नगर पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. ठाकरे गटातील काहींनी शिंदे गटाविरुद्ध तसंच नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं होतं.
कोरोना पुन्हा आला? देशातील रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक
मागची दोन वर्षं जगासह भारतात कोरोनाने हाहाकार माजवला. या भयंकर संसर्गजन्य रोगामुळे लाखो जणांना आपला जीव गमवावा लागला. दोन वर्षं कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली जगत असताना यावर्षी संसर्ग आटोक्यात होता. परंतु आता भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशात एकाच दिवसात 2797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या मागच्या काही दिवसांतल्या रुग्णसंख्येपेक्षा सुमारे 900 पेक्षा अधिक आहे. रुग्णसंख्या वाढत असताना संसर्ग झालेले रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत ही दिलासादायक बाब आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली आली आहे.
बालविवाहाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून धक्कादायक आकडेवारी जाहीर; झारखंडमध्ये सर्वाधिक बालविवाह
झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असताना बालविवाहाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारी नुसार झारखंडमध्ये बालविवाहाची टक्केवारी सर्वाधिक ५.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. तर १८ वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण १.९ टक्के आहे. देशात सर्वात कमी म्हणजे शून्य बालविवाह केरळमध्ये आहे.
भारतीय हवाई दलासाठी नवीन ‘शस्त्र’ प्रणाली शाखा; केंद्र सरकारची मंजूरी
केंद्र सरकारने भारतीय हवाई दलासाठी नवीन शस्त्र प्रणाली शाखा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय हवाई दलात नवीन शाखा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे विमान प्रशिक्षणाच्या खर्चात कपात होईल, अशी माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी दिली.नवी दिल्लीतील एनसीआर येथे भारतीय वायुसेना दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली होती. तेव्हा एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात नवीन शस्त्र प्रणाली शाखा स्थापन करण्यात येणार आहे. या शाखेमुळे विमान प्रशिक्षणाच्या खर्चात कपात होत, ३,४०० कोटी रुपयांची बचत होणार आहे.” या नव्या शाखेच्या माध्यमातून हवाई दलातली सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली हाताळण्यात येणार आहे.
रतन टाटांना ‘सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या ‘सेवा भारती’ संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समाजसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रतन टाटा प्रत्यक्षात या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या दोन्ही नामवंत व्यक्तींना ‘सामजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान’ यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा
वाढते गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करू नका, असे आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना शुक्रवारी केले. भारतात प्रवास करण्याबाबतची नियमावली अमेरिकेने शुक्रवारी जारी केली. त्यानुसार प्रवास नियमावलीची पातळी दोन पर्यंत कमी केली. गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात फिरताना अतिसावध राहा, असे अमेरिकेने जारी केलेल्या प्रवास नियमावलीत म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी पाकिस्तानबाबतची प्रवास नियमावली जाहीर करून त्याला तिसऱ्या पातळीवर ठेवले होते. दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचारग्रस्त पाकिस्तानात प्रवास करणार असाल तर त्याबाबत पुनर्विचार करा, असा इशारा आपल्या नागरिकांना दिला होता.
‘हर हर महादेव’ चित्रपटात सायली संजीवची वर्णी; पहिल्यांदाच साकारणार ऐतिहासिक भूमिका
बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडीओची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असणार आहे. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता चित्रपटात आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री सायली संजीव चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांची भूमिका सायली साकारणार आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले आहे. यानिमित्ताने सायली पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत सुवर्णपदक
गुजरात येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची लेक राधिका आवटीला तलवारबाजीत सुवर्णपदक मिळाले. याआधी रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत फॉइल प्रकारात सुवर्णपदक पटकावून कतार (दोहा) येथील फॉइल ग्रँड प्रीक्स स्पर्धेसाठी तसेच ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती. हे तिचे सलग चौथे सुवर्णपदक आहे.सांगलीत असलेल्या राधिका प्रकाश आवटी हिने गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळकडून खेळताना तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेतील हे सलग चौथे सुवर्णपदक ठरले आहे.
करोडो फुटबॉल चाहते हळहळले… मेसी खेळाडूची मोठी घोषणा, खेळणार शेवटचा वर्ल्ड कप
भारत जरी क्रिकेटवेडा देश असला तरी जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असं विचाराल तर उत्तर येईल फुटबॉल. जगभरात फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत. याच खेळातले त्यांचे देव आहेत पेले, माराडोना, रोनाल्डो, मेसी हे महान खेळाडू. यापैकी सध्या खेळत असलेले मेसी आणि रोनाल्डो हे तर फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातले ताईत आहेत. भारतात या दोघांचा खेळ पाहण्यासाठी लोक रात्र रात्र जागवतात. अवघ्या काही दिवसात फुटबॉलप्रेमींना फिफा वर्ल्ड कपमध्ये या दोघांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पण त्याआधीच त्यातल्या एकानं फुटबॉल प्रेमींना धक्का दिलाय. कारण कतारमधला आगामी फिफा वर्ल्ड कप हा त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा वर्ल्ड कप असल्याची त्यानं घोषणा केली आहे.अर्जेन्टिनाचा महान फुटबॉलर लायनल मेसीनं तो शेवटचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण मेसीनं शेवटचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं म्हणत थेट निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मेसी सध्या 35 वर्षांचा आहे.
SD Social Media
9850 60 3590