कच्च्या तेलाच्या किंमतीनी प्रति बॅरेल 140 डॉलरचा टप्पा गाठला

सर्वसामान्यांना महागाईच्या डोस मिळण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीनी प्रति बॅरेल 140 डॉलरचा टप्पा गाठला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची नाराजी टाळण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून इंधनाच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या. त्यामुळे तेल कंपन्यांच्या गटातून वाढत्या तोटा कमी करण्यासाठी भाववाढीचा दबाव आणला जात आहे.

चालू आठवड्यात पेट्रोलच्या किंमती सव्वाशेपार पोहोचल्यास महागाईचा आगडोंब उसळू शकतो. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्यूचर्स, यूएस ऑईल बेंचमार्क वाढीसह 130.50 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. जुलै 2008 नंतरचा सर्वाधिक भाव ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेट क्रूड 139.13 डॉलर प्रति बॅरेलच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

भारत इंधनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. तब्बल 85 टक्के इंधन परदेशातून आयात केले जाते. कच्च्या तेलाच्या भाववाढीला रशिया-युक्रेन संकटाच कारण सांगितलं जातं. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संबंधामुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेनं रशियाच्या आर्थिक नाकेबंदीचं हत्यार उपसलं आहे. यामुळे तेल पुरवठ्यावर थेट परिणाम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक राष्ट्रांनी प्रतिबंधात्मक मार्ग म्हणून इंधनाचे साठे करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

सध्या उत्तरप्रदेश सहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. शंभरीपार पोहचलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन मतदारांची नाराजी टाळण्यासाठी केंद्रानं अद्याप दरवाढ केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.