कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना संकटकाळात समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. देशभर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले आहे. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला आहे. तसेच त्यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणाा केली आहे. त्यांच्या या स्तुत्य पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कल्याण-डोंबिवलीतही कोरोनाचा मोठा फैलाव
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज कोरोनाचे साधारण 1500 ते 1700 रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तर दुसरीकडे ऑक्सिजनची पुरवठा होत असलेल्या बेडची कमतरता अशी भीषण परिस्थिती असल्यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांना वाचवणे मुश्किल बनत आहे. प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
कल्याण-डोंबिवलीत काही ठिकाणी कोविड रुग्णालये तयार झाली आहेत. त्यापैकी कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी येथे 100 बेडचे रुग्णालय सज्ज आहे. काही दिवसात हे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने नव्याने कोविड रुग्णालय सुरु न करण्याची सूचना प्रशासनाला सरकारने केली आहे. त्यामुळे नवे कोविड रुग्णालय सुरु होत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचे 4 मे रोजी लग्न होणार आहे. या लग्नासाठी काही महिन्यापासून गायकवाड कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुलाचे लग्न अत्यंत साधेपणा करण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला आहे. या लग्नासाठी जो खर्च येणार होता, ते सगळे पैसे विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेसाठी खर्च केले जातील, अशी घोषणा आमदार गायकवाड यांनी केली आहे. 1500 नागरिकांना स्वखर्चातून लस उपलब्ध करून देण्याचा निर्धार गायकवाड यांनी केला आहे.