नाशिकच्या क्रीडा, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राला धक्का बसला आहे. नाशिकसह मालेगावात दिवसभरात तीन दिग्गजांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मालेगावमध्ये शिवसेना नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कविता किशोर बच्छाव असे या नगरसेविकेचे नाव आहे. त्या मालेगाव प्रभाग क्रमांक 1 च्या माजी सभापती होत्या. त्यामुळे मालेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कविता बच्छाव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला सौम्य लक्षण असल्याने त्या होम क्वारंटाईन होत्या. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र काल रात्री उशिरा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी शिवसेना नगरसेविका कविता बच्छाव यांची प्राणज्योत मालवली.
तर दुसरीकडे नाशिकमधील ज्येष्ठ कवी उपेंद्र पाराशेरे आणि क्रीडा शिक्षक प्रशांत भाबड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर नाशिकच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे