सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. यामुळे समाज लयाला जाऊ शकतो, अशी भीतीही वारंवार निदर्शनास आणली जाते. मात्र ही माध्यमे समाज जोडण्यासाठीही कामी येऊ शकतात. गरजवंतांना उच्च शिक्षण, रुग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार आणि भुकेल्यांना अन्न जेण्यासाठीही यांचा वापर करता येऊ शकतो, फक्त समाजमाध्यमांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे मत औरंगाबादच्या तरुणीने आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडले.
युरोपियन युनियनने घेतलेल्या या परिषदेत 5 देशांतून आलेल्या तरुणांमध्ये या भारतीय विद्यार्थिनीचे मत वेगळे ठरले. त्यामुळे तिला खास शिष्यवृत्ती देण्यात आली. ही तरुणी आहे औरंगाबादची महाविद्यालयीन विद्यार्थिनी दिया वैष्णव. नुकतीच तिची ‘कॅपेसिटी बिल्डिंग इन यूथ’ या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. हा मान मिळालेली ती एकमेव भारतीय आहे. येत्या दोन वर्षात विविध देशांतील सेमिनारसाठी उपस्थित राहण्याचा खर्चही युरोपियन युनियनद्वारे दिला जाणार आहे.
युरोपियन युनियनने भारत, रोमानिया, स्लोव्हेनिया, सर्बिया आणि नॉर्थ मॅसिडोनिया या देशांतील तरुणांची ‘यूथ एक्सचेंज’ परिषद 12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान, दक्षिण पूर्व युरोपातील सेर्बिया येथे झाली. यात संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांवर चर्चा झाली. यात पाचही देशांतील विद्यार्थ्यांपेक्षा भारतीय विद्यार्थिनीने मांडलेले विचार वेगळे ठरले.
सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराबाबत दिया म्हणाली, जगातील तरुणाई डिजिटल मीडिया, व्हिडिओ स्ट्रिमिंगवर खूप वेळ खर्च करते. त्यामुळे सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण करुन समाजात परिवर्तन घडवण्यासाठी हे माध्यम मोठी भूमिका बजावू शकते. यात तिने पॉडकास्ट, व्हिडिओ स्टोरी, फोटो स्टोरी आणि ऑनलाइन ट्रेनिंग मोड्यूलची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या वैयक्तिक मुलाखतीतही दियाने हा विषय सविस्तर मांडला.
दरम्यान, पाच देशांतून निवड झालेली दिया वयाने सर्वात लहान आणि भारतातील एकमेव तरुणी आहे, अशी माहिती एज्युकिरॉन इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय सल्लागार रवी पळसवाडीकर यांनी दिली. भविष्यात तरुणांमध्ये शाश्वत विकासाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी तसेच 2030 पर्यंत युवकांच्या सहभागासाठी आणि प्रचारासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात तिची मोठी भूमिका असेल, असेही सांगण्यात आले आहे.