मुंबईत पुन्हा दाऊदची दादागिरी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

डॉनच्या मुसक्या आवळल्या जाणार?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा त्याच्या कुकृत्यांमुळे जगभरात कुप्रसिद्ध आहे. मुंबईत 1993 साली घडलेल्या बॉम्ब हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात होता. या बॉम्ब हल्ल्यानंतर तो अंडरग्राउंड झाला आणि विदेशात पळून जाण्यात यशस्वी ठरला. तो सध्या पाकिस्तानात लपून बसल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे. पण त्याचे धागेदोरे अजूनही मुंबईत असल्याची माहिती वारंवार समोर येत असते. दाऊदचे भारतात अनेक हस्तक आहेत आणि ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती याआधीदेखील समोर आली आहे. विशेष म्हणजे यावेळी तर आणखी भयानक माहिती समोर आली आहे. मुंबईतील भेंडी बाजारमध्ये पुनर्विकास प्रकल्पातील बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी त्याचे हस्तक नागरिकांना जबरदस्ती दमदाटी करुन घर खाली करायला लावत आहेत आणि विकासकांचा फायदा करुन देत आहेत, असा धक्कादायक दावा केला जातोय. त्याच्या देशातील कुकृत्यांची दखल महाराष्ट्र सरकारनेदेखील घेतली आहे आणि महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या भेंडी बाजारमधील SBUT पुनर्विकास प्रकल्प वादात सापडण्याची शक्यता आहे. या पुनर्विकास प्रकल्पात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाऊदच्या हस्तकांनी भेंडी बाजार परिसरातील अनेक घरं रिकामे केल्याचा आणि या परिसरातील तीन मोठे रस्ते बंद केल्याचा आरोप करण्यात येतोय. पुनर्विकास प्रकल्पातील बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी दाऊदचे हस्तकांकडून जोरजबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या एनओसी या कोणत्याही पडताळणीशिवाय देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. दाऊद पाकिस्तानमध्ये राहत असूनही त्याला एसबीयूटी प्रकल्पात किती रस आहे ते या निमित्ताने समोर येत आहे.

याप्रकरणी अजय अग्रवाल यांनी सलीम फ्रूटशी संबंधित व्हिडीओ जारी केला आहे. तो भेंडी बाजारमध्ये दादागिरी करुन घरं खाली करुन घेत असल्याचा दावा त्या व्हिडीओत करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम याची मुंबईत भरपूर संपत्ती आहे, असा दावा अजय अग्रवाल यांनी केला आहे. दाऊदची पत्नी आणि भावाच्या नावाने संपत्ती आहे. ते 1984 सालापर्यंत तिथेच वास्तव्यास होते, असं अजय अग्रावाल म्हणाले आहेत. मी या प्रकरणी गृहमंत्र्यांना भेटेन, असंदेखील अग्रवाल यांनी सांगितलंय.

दाऊदची संपत्ती सरकारच्या निशाण्यावर

दाऊदच्या कुकृत्यांमुळे त्याची मुंबईतील संपत्ती ही राज्य सरकारच्या निशाण्यावर आहे. दाऊद आणि त्याच्या हस्तकांची संपत्तीची यादी तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे. याच संपत्तीमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर हा दहशतावदी कारवायांसाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच हा सगळा पैसा पाकिस्तानला नेला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे दाऊची संपत्ती सरकारच्या रडारवर आली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिमची संपत्तीची यादी तयार करण्याचे पोलिसांना आदेश दिल्याचं सांगितलं होतं. सरकार या संपत्तीवर कारवाई करणार आहे. त्यांच्या आदेशानंतर पोलीस कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दाऊद इब्राहिम, त्याचे हस्तक छोटा शकील, अनिश इब्राहिम, टायगर मेमन यांची संपत्ती संपूर्ण राज्यात कुठेकुठे आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्याबाबतची यादी तयार झाल्यानंतर पोलीस ती यादी सरकारला देईल. त्यानंतर सरकार पुढची कारवाई करेल. संपत्तीतून जो पैसा मिळतो त्याचा उपयोग दहशतावादी कारवायांसाठी केला जातो, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.