रामदास फुटाणे यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता, वात्रटिका, चित्रपटाचे लेखन, निर्माते, दिग्दर्शनाबरोबरच त्यांचा राजकीय क्षेत्रातील आमदारकीपर्यंतचा प्रवास मोठा आहे. रामदास फुटाणे हे मूळचे नगर जिह्यातील जामखेडचे. १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्यांचा ‘कटपीस’ हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला. त्यानंतर ‘सफेद टोपी, लाल बत्ती’, ‘चांगभलं’ हे मराठी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९९७ साली त्यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कवितासंग्रहाने वेगळीच कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली. या कवितांचे जाहीर कार्यक्रम सादर होऊ लागले तशी रसिकांची दादही त्याला मिळत गेली. पुढे फोडणी, कॉकटेल हे मराठी ककितासंग्रह प्रसिध्द झाले. त्यांनी साहित्य, कला, राजकीय क्षेत्रात मुक्त संचार केला. रामदास फुटाणे यांची निरीक्षणशक्ती आणि सर्वांमध्ये मिसळून वेगळेपण शोधण्याची कलाच त्यांना भाष्यकवितांसाठी उपयोगी पडत गेली. पाना- फुलांच्या कवितांपेक्षा त्यांनी राजकीय प्रसंग, वातावरणातील कविता सादर करणे पसंद केले. त्यातूनच त्यांचा एक रसिकवर्ग निर्माण झाला. फुटाणे नेहमी सांगतात, वात्रटिका हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा शब्द. वात्रटिका या खऱया तर भाष्य कविता आहेत. त्या सोप्या आणि चटकन भिडतात. चार ओळींची वात्रटिका लिहिणे हे सोपे नाही. त्यासाठी ४० ओळी लिहाव्या लागतात, त्यातून चार ओळी तयार होतात. कोणतीही घटना सोप्या पध्दतीने आणि शक्यतो व्यक्तीचे नाव न घेता ही भाष्यकविता मांडली जाते. ग्रामीण भागातील आणि नवकवींना काव्यसंमेलनात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नानांचे योगदान मोठे आहे. आज अनेक कवी त्यातूनच तयार झाले. साहित्यातील त्यांची ही घोडदौड सुरू असतानाच त्यांचे एकीकडे चित्रपटाचे लेखन सुरू होते. त्यांनी १९७५ साली निर्मिती केलेला ‘सामना’ चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाचे गारूड रसिकांच्या मनावर आहे. त्याचबरोबर सर्कसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांच्या सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार आणि १९७५ साली बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी याची निवड झाली. नंतर सर्वसाक्षी या चित्रपटाची पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. पुढे सुर्वंता चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. सुर्वंता चित्रपटाला उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५ चा राज्य पुरस्कार आणि १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार मिळाला होता. रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या काव्यसंग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ‘फोडणी’ला या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार, गोवा कला अकादमीचा वाक्यहोत्र पुरस्कार मिळाला आहे. रामदास फुटाणे यांना प्रसिध्द कलावंत दादा कोंडके, निळू फुले, भालजी पेंढारकर, विजय तेंडुलकर यांचा सहवास लाभला. प्रत्येकामध्ये असलेले वेगळेपण जवळून अनुभवता आले. भाष्य कविता कशी सुचते हे सांगताना फुटाणे म्हणतात, मी खूप निरीक्षण करतो, सर्व पक्षातील व्यक्तींशी माझी मैत्री आहे. राजकीय व्यक्ती नीट माहिती हवी, महाराष्ट्रातील प्रवाह तुम्हाला माहिती असले पाहिजे. ट ट आणि प प लिहून चालत नाही. भाष्यकवितांमध्ये आशय महत्त्वाचा असतो. विसंगती नेमकी शोधता आली तर उत्तम भाष्यकविता तयार होते. हिंदी कविता ऐकूनच आपण भाष्यकवितांकडे वळालो. कीर्तन ऐकणे, ग्रंथालयात खूप वेळ देणे आणि तर्कशुध्दीने विचार करणे यामुळेच कवितांचा प्रवास करू शकलो असे रामदास फुटाणे सांगतात. रामदास फुटाणे यांच्या कोपरखळया मारणाऱया वात्रटिकां इतक्याच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात. आपल्या समुहाकडून रामदास फुटाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर, पुणे