आज दि.१२ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

आध्यात्मिक वनात दिसणार वनवासातील राम; शरयू तिरावर उभे राहणार ओपन एअर म्युझियम

अयोध्येतील शरयू नदीच्या तिरावर ‘रामायण आध्यात्मिक वन’ साकार होत असून त्यातून भाविकांना प्रभू श्रीरामाचा १४ वर्षांच्या वनवासाचा काळ अनुभवता येईल. या वनसंपदेत ‘ओपन- एअर म्युझियम’चा देखील समावेश असून त्यात रामायणातील काही प्रसंग पाहता येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. अयोध्येत तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचाच तो एक भाग आहे.या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ भाविकच नाही तर निसर्गप्रेमींसाठी देखील येथे खूप काही उपलब्ध असेल. पर्यावरण आणि अध्यात्माचा अनोखा संगम येथे पाहायला मिळणार आहे.’’ अयोध्येचा फेरविकास आराखडा हा येत्या दहा वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून या शहरामध्ये तब्बल ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. सार्वजनिक आणि खासगी भागिदारीतून रामायण आध्यात्मिक वनाची उभारणी करण्यात येत असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.

“गुजराती उद्योजकांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी”; शहांची ‘व्हायब्रंट गुजरात’मध्ये थेट ऑफर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजराती उद्योजकांना उत्तर भारतात विशेषतः काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. यावेळी या समिटमध्ये जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते. 

वाद, हिंसा होण्याचा धोका… दक्षिण आफ्रिका क्रिकेटने कर्णधाराला हटवलं

19 वर्षाखाली वर्ल्डकप सुरू होण्यास काही आठवडेच शिल्लक आहेत. मात्र त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी 19 वर्षाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या कर्णधाराला हटवलं आहे. हा निर्णय पायउतार होणारा कर्णधार डेव्हिड टीजेरने इस्रायलचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यानंतर घेण्यात आला आहे. डेव्हिडने इस्रायल सैनिकांचे समर्थन केलं होतं.

त्यानंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकेने या वक्तव्यानंतर विरोधी ग्रुपकडून प्रदर्शनादरम्यान वाद आणि हिंसा देखील केली जाऊ शकते त्यामुळे डेव्हिडला कर्णधारपदावरून हटवण्यात येत असल्याचे सांगितले.

वांद्रे-वरळी सीलिंकचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “पूर्वी हजारो लाखो रुपयांच्या महाघोटाळ्यांची चर्चा असायची, आता…”

मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतू सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू म्हणून प्रचिती असलेल्या या सेतूबद्दल नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले. तसंच, अटल सेतूबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात बांधलेल्या वांद्रे-वरळी सीलिंकशी याची तुलना केली. तसंच, काँग्रेसवरही टीकास्र डागलं.

सातारा : श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अगदीच खालावली. आणि आज शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रत्येकाशी अत्यंत आपुलकी व प्रेमाने वागणे हा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांना सर्वजण माई म्हणून आदराने ओळखत. चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील बर्गे कुटुंबात २६ जुलै १९४८ रोजी रजनीदेवी यांचा जन्म झाला. श्रीनिवास पाटील यांच्याशी त्या १६ मे १९६८ रोजी विवाहबद्ध झाल्या. पतीच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम त्यांना सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर

देशातील कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर गेल्याची माहिती सार्स सीओव्ही २ जिनोमिक्स कन्सोर्टियमकडून (आयएनएसएसीओजी) शुकवारी देण्यात आली. जेएन.१ व्हेरियंटचा रुग्ण उत्तर प्रदेशातही आढळला असून यानंतर सदर व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेल्या राज्यांची संख्या १६ वर पोहोचली आहे.

कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट म्हणून जेएन.१ व्हेरिएंट ओळखला जातो. कर्नाटक राज्यात या व्हेरिएंटचे सर्वाधिक २१४ रुग्ण आहेत. यापाठोपाठ महाराष्ट्रात १७०, केरळमध्ये १५४, आंध्र प्रदेशात १८९, गुजरातमध्ये ७६, गोवा राज्यात ६६, राजस्थान आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी ३२, छत्तीसगडमध्ये २५, तामिळनाडूमध्ये २२ रुग्ण सापडले आहेत.

याशिवाय दिल्लीत १६, उत्तर प्रदेशात ६, हरियाणामध्ये ५, ओडिशामध्ये ३, पश्चिम बंगालमध्ये दोन तर उत्तराखंडमध्ये एक रुग्ण सापडलेला आहे.

लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार; CM एकनाथ शिंदेंचा इशारा

महाराष्ट्रातील अटल बिहारी वाजपेयी शिवारी-न्हावा शेवा अटल पुलाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर जाहीर सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, अशी घोषणा देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यात अबकी बार 45  पार ही आमची जबाबदारी असल्याचे शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भूकंप येणार आहे. हा भूकंप विरोधी पक्ष सहन करु शकणार नाहीत, असा इशारा देखील शिंदेंनी दिला.

सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करणार! नेटमध्ये केली सरावाला सुरुवात

दुखापतीने त्रस्त असलेल्या सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२४ पूर्वी नेटमध्ये सराव सुरू केला आहे. सूर्याने शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो नेटमध्ये जोरदार फलंदाजी करताना दिसला. व्हिडीओ पाहिल्यानंतर, असे दिसते की सूर्यकुमार त्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि आगामी आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

सचिन तेंडुलकरने ‘पंचक’ चित्रपटाचं केलं कौतुक, माधुरी दीक्षित व श्रीराम नेनेंचे मानले आभार

माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरू आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या या चित्रपटाची कथा रसिक प्रेक्षकांना आवडली आहे.‘पंचक’ची कथा कोकणातील खोत कुटुंबावर आधारित आहे. जयंत जठार व राहुल आवटे यांनी उत्तमरित्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘पंचक’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.