अमेरिकेतील भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी याबाबत घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक सर्वसमावेशकता आणि वातावरण बदल या क्षेत्रांमध्ये बंगा यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली.
जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिल मालपास यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून मे महिन्यापर्यंत नव्या अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे. असे असल्याने बंगा यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपदी असते.
बंगा यांचा परिचय
अजयपाल सिंग बंगा यांचा जन्म १९५९ साली पुण्यात झाला. हैदराबादमध्ये प्राथमिक शिक्षण आणि दिल्लीत उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या आयआयएममधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी नेस्ले, पेप्सिको यासारख्या अनेक बडय़ा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली. मास्टरकार्ड कंपनीमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिलेले बंगा १ जानेवारी २०२२पासून जनरल ॲटलांटिक कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
इतिहासातील अत्यंत नाजूक क्षणी जागतिक बँकेची धुरा वाहण्याची एकटय़ा अजय यांच्याकडे क्षमता आहे. विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक आणणाऱ्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांची उभारणी आणि व्यवस्थापनाचा त्यांना तीन दशकांचा अनुभव आहे. – जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका