भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणालाच सोडचिठ्ठी दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले असून बंगालच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. एखादा नेता नाराज असतो, तेव्हा तो फार फार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. पण सुप्रियो यांनी थेट राजकीय संन्यास घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुप्रियो यांनी राजकीय संन्यास घेण्यामागची कारणं काय आहेत? याचा घेतलेला हा मागोवा.
बाबुल सुप्रियो हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री होते. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून ते सलग दोनवेळा निवडून आले आहेत. मात्र, बाबुल सुप्रियो मंत्री असताना भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणता आली नाही. एवढेच नव्हे तर ते स्वत: टोलीगंज विधानसभा मतदारसंघातून सुमारे 50 हजार मतांनी पराभूत झाले. मंत्री आणि खासदार असतानाही सुप्रियो पराभूत झाल्याने पक्षातून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना पक्षातून साईडलाईन करण्यात आले होते. म्हणूनच त्यांनी राजकारणच सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकी ममता बॅनर्जी यांची पुन्हा सत्ता आली. त्यामुळे सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी सारख्या क्रूर महिलेला निवडून देऊन पश्चिम बंगालच्या जनतेने ऐतिहासिक चूक केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एखाद्या महिलेबद्दल अनादर व्यक्त करणारी ही पोस्ट खुद्द भाजपच्या नेत्यांनाही आवडली नव्हती. त्यामुळे त्यांना वरिष्ठ नेत्यांनी तंबीही दिली होती. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारचा विस्तार करण्यात आला. यावेळी बाबुल सुप्रियो यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे ते नाराज होते. मंत्रीपद गेल्यानंतर ते भाजपच्या कार्यक्रमातही भाग घेत नव्हते. या अस्वस्थतेतूनच त्यांनी राजीना दिल्याचं सांगितलं जातं.
(फोटो क्रेडिट गुगल)