गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता शाहरुख खानने दुवा पढली. त्यावरून वाद रंगला आहे. यावेळी शाहरुख खान थुंकल्याचं सांगत काही ट्रोलर्सनी शाहरुखवर हल्ला चढवला आहे. शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत.
शाहरुख खान दुवा मागत होता. त्याला ट्रोल केलं जातंय. हा काय प्रकार आहे. हा निव्वळ नालायक आणि बेशरमपणा आहे. एका गटाकडून, परिवाराकडून शाहरुखला ट्रोल केलं जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी टीका करताना कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी एका परिवाराकडून शाहरुखला ट्रोल केलं जात आहे, असं सांगून संशयाची सुई भाजपच्या दिशेने वळवली आहे. त्यामुळे राऊत यांच्या या टीकेवरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भाजप त्यावर काय प्रतिक्रिया देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निशाणा साधला. हे कोण लोक आहेत. त्यांना थोडीही लाज नाही. अशा वेळीही हे लोक धर्म जातीचं राजकारण करत आहे. ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? तुम्ही देशाची वाट लावली आहे, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी लतादीदींना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होते. या दोघांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाहरुख खानने इस्लामिक परंपरेनुसार दुवा मागण्यासाठी दोन्ही हात वर केले. त्यानंतर लतादीदींच्या पायांना स्पर्श करुन अभिवादन केलं. त्यानंतर दुवा पठण केल्यानंतर मास्क काढून परंपरेनुसार फुंकर मारली. मात्र, शाहरुख खान थुंकल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल झाले. शाहरुखला ट्रोल केलं गेलं. त्यामुळे संजय राऊत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापलं असून इस्लामिक परंपरा समजावून सांगितलं आहे.