अमरावतीमधील श्री क्षेत्र झुंज येथे
बोट उलटून 11 जणांना जलसमाधी
अमरावतीमधील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये ११ जण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. वर्धा नदीच्या तिरावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. यामध्ये ११ जण बुडाले असून चार जणांचे मृतदेह हाती लागले आहे. तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह हाती लागला आहे.
तर नरेंद्र मोदी सरकारही
पडू शकते : अण्णा हजारे
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस अथवा इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य मिळण्याची शक्यता नाही. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते सत्ता, सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता याच्यामागे लागले आहेत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी जनतेचे संघटन (जनसंसद) आवश्यक आहे. मजबूत जनसंसदेशिवाय देश वाचणार नाही असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. झोपलेली जनता जागी झाली तर नरेंद्र मोदी सरकारही पडू शकते असा इशारा हजारे यांनी दिला आहे.
ओबीसी आरक्षण प्रश्नावरुन
भाजपचे उद्या राज्यभर आंदोलन
ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या (१५ सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.”, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि योगेश टिळेकर यांनी दिली. आघाडी सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तर माझा राजीनामा देण्याची
तयारी : मंत्री वडेट्टीवार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात ५ ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटेल असं दिसत नाही. आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी यावेळी राजीनामा देण्याची तयारीही दाखवली आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर
पुतिन सेल्फ आयसोलेट
आता करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन सेल्फ आयसोलेट झाले आहेत. पुतिन यांच्या काही सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुतिन यांनी स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
हिमाचल प्रदेशातील भाजपचे
मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता
भाजपाशासित राज्यात मागील सहा महिन्यांमधील पाचव्यांदा मुख्यमंत्री बदल झाला. या नेतृत्वबदलाची चर्चा सुरु असतानाच आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर आज दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ठाकुर हे दिल्लीवरुन शिमल्याला परतले होते. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेटही घेतली होती. आता पुन्हा त्यांना दिल्लीवरुन बोलावणं आल्याने हिमाचलमध्ये नेतृत्व बदलांच्या चर्चा सुरु झाल्यात. ठाकुर दिल्लीमधील आमंत्रणाचा संबंध गुजरातशी जोडला जात आहे.
नीट परीक्षेचा पेपर जयपूरमध्ये
लीक आठ जणांविरुद्ध गुन्हा
जयपूरमध्ये NEET परीक्षा २०२१ चा पेपर लीक झाल्याचं प्रकरणं समोर आलं आहे. रविवारी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान जयपूरमध्ये पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर सकाळी २ वाजता सुरू झाला आणि पेपर २.३० वाजता व्हॉट्सअॅपद्वारे लीक झाला. या संपूर्ण प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
झोमॅटोचे गौरव गुप्ता
कंपनी सोडणार
ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कंपनीने ई-किराणा व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. झोमॅटोने फूड डिलिव्हरीसह किराणा मालाची विक्रीही सुरु केली होती. झोमॅटोनं किराणा मालाची डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय़ घेतला होता. गौरव गुप्ता झोमॅटोचे पुरवठा प्रमुख होते.
टीका करताना भान
ठेवायला हवे : प्रिया बेर्डे
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रवीण दरेकर यांनी “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान केलं. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनीही भाजपवर टीका केली आहे. प्रिया बेर्डे म्हणाल्या टीका करताना भान ठेवायला हवे.
PMC बँकेच्या ग्राहकांना
पैसे परत मिळणार
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) आणि गुरु राघवेंद्र सहकारी बँकेत पैसे अडकून पडल्यामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ग्राहकांचे पैसे परत केले जातील. रिझर्व्ह बँकेला 10,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. हे पैसे डिपॉझिट इन्शुरन्स स्कीम अंतर्गत परत केले जातील. यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि 90 दिवसांच्या आत रक्कम परत देण्याची हमी देण्यात आली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
SD social media
9850 60 3590