अमेरिकेत गोळीबारांच्या घटना सुरुच आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर आता ओक्लाहोमामध्येही अनेकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. तुलसा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल कॅम्पसजवळ झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. नंतर पोलिसांनी या हल्लेखोरालाही ठार केले. या गोळीबारात अनेक जण जखमीही झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओक्लाहोमा येथील तुलसा हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात एका बंदुकधारीसह चार जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. तुलसा पोलीस विभागाने ट्विटरवर सांगितले की, अधिकारी अजूनही सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल कॉम्प्लेक्स रिकामी करण्यासाठी काम करत आहेत.
कॅप्टन रिचर्ड म्यूलेनबर्ग यांनी एबीसीला सांगितलं की, मेडिकल कॅम्पसमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीचा पोलिसांना फोन आला आणि त्या व्यक्तीने “एक्टिव्ह शूटर म्हणून गोळीबार सुरू केला” असे कळले.
म्यूलेनबर्ग म्हणाले की, अधिकारी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत “काही लोकांना गोळ्या घातल्या गेल्याचे त्यांना आढळले. एक जोडपे आधीच मरण पावले होते.” ते म्हणाले, “आम्हाला तो शूटरही मृत आढळला. आम्ही त्याला शूटर मानत आहोत कारण त्याच्याकडे एक लांब रायफल आणि एक पिस्तूल होती. संशयित हल्लेखोर व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.
अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना
अमेरिकेत 2022 मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या 233 घटनांची नोंद झाली आहे. नुकतेच टेक्सासच्या एका शाळेत घुसून हल्लेखोराने 18 निष्पाप मुलांना आपलं शिकार बनवलं होतं. या हल्ल्यात अन्य तिघांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर अमेरिकेत बंदुकांबाबत कडक कायदे होणार असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. मात्र या वादाच्या भोवऱ्यात सतत सामूहिक शूटिंगची प्रक्रिया सुरू आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या कायद्याचा उल्लेख केला आहे.