पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचं निधन
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं शुक्रवारी निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बऱ्याच काळापासून पाकचे माजी लष्करशहा परवेज यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
परवेज मुशर्रफ हे 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. याशिवाय ते पाकिस्तानचे आर्मी प्रमुखही होते. भारताविरोधात झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांनाच जबाबदार धरलं जातं.
राज्यसभा निवडणुकीत २८५
आमदारांकडून मतदान
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला
सांगलीतून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीतील उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास जॉगिंगला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला. अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केले आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असताना हा प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील जामा मशिदीबाहेर
नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी
दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.
LIC च्या शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणूकदारांचं 1.4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजार आज लाल रंगात सुरु झाला मात्र बंद होईपर्यंत जबरदस्त रिकव्हरी दिसून आली. निफ्टी 120 अंकांनी वधारला आणि सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. बाजार सकारात्मक झाल्यानंतरही एलआयसीच्या शेअरच्या किमतीने नवा नीचांक गाठला. आज नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 720.10 रुपयांची विक्रमी नीचांकी पातळी एलआयसीच्या शेअरने गाठली.
गुरुवारी 729.90 रुपयांवर उघडल्यानंतर बाजार बंद होताना शेअर दबावाखाली दिसून आला. गुंतवणूकदारांच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. लिस्टिंगनंतर सातत्याने घसरत असलेल्या देशातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीची मार्केट कॅप 4.6 लाख कोटी रुपयांवर आली आहे. जेव्हा सरकारने LIC चा IPO आणला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप अंदाजे 6 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे LIC शेअर्समध्ये सुमारे 1.4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करता येणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने बुधवारी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मला क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांशी जोडणे सोपं आहे. रिझर्व्ह बँक स्वदेशी RuPay क्रेडिट कार्डसह ही सुविधा सुरू करेल, ज्याची घोषणा RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 8 जून रोजी केली होती. ग्राहकांना अधिक सुविधा देणे आणि डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात दोन
दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
सुमारे दहा दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी त्याचा प्रवेश जाहीर केला. गोव्याची हद्द ओलांडून मोसमी पाऊस दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रपती पदाच्या
निवडणुकीची घोषणा
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिष्णोई गँगकडून सलमानला
काळवीट शिकारीवरुन धमकी
“सलमान खानने काळवीट मारलं आहे. त्याला सर्व प्रकरणांमधून दोषमुक्त करण्यात आलंय. त्याने काळवीटाची शिकार करुन खूप मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतोय की पुढे आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार. यामध्ये कोणतीच शंका नाहीय,” हा इशारा सलमानला दिलाय बिष्णोईने टोळीचा प्रमुख असणाऱ्या लॉरेन्स विष्णोईचा मानलेला भाऊ राजवीर सोपूने! यापूर्वी चार वर्षांआधीही लॉरेन्स बिष्णोईने सलमानला ठार मारण्याची धमकी दिलेली. जेव्हा सलमान जोधपूरला येईल तेव्हा त्याला ठार मारु असं लॉरेन्स म्हणालेला. लॉरेन्स सध्या तुरुंगामध्ये आहे.
नागपूर जिल्ह्यात ४३ नवीन
करोनाग्रस्तांची नोंद
करोनाची तिसरी लाट ओसरल्यावर प्रथमच नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी २४ तासात तब्बल ४३ नवीन करोनाग्रस्तांची नोंद झाली. या रुग्णांपैकी निवडक जणांचा अपवाद वगळल्यास संक्रमित रुग्णांची जिल्ह्याबाहेर प्रवासाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मुलीचा
मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ
मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ वर्षाच्या मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बापाला अखेर मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली. भर उन्हात हा बाप आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात होता.
SD social media
9850 60 3590