प्रस्तावित कृषी कायदे मागे
घेण्याची पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
शेतकरी आंदोलन लगेच मागे
घेणार नाही : राकेश टिकैत
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकरी लगेच घरी परतणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर टिकैत यांनी ट्विटरवरुन पहिली प्रतिक्रिया दिलीय. टिकैत यांनी ट्विटरवरुन आंदोलन लगेच मागे घेतलं जाणार नाही असं म्हटलं आहे. “आंदोलन लगेच मागे घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसापर्यंत वाट बघू जोपर्यंत कृषी कायदे संसदेमध्ये रद्द केले जातील. सरकार एमएसपीबरोबरच शेतकऱ्यांच्या दुसऱ्या मुद्द्यांवर पण चर्चा केली पाहिजे, (नाहीतर तोपर्यंत आम्ही वाट पाहू)”, असं टिकैत म्हणाले आहेत.
सर्वांशी चर्चा करूनच कायद्यात
बदल करावा : शरद पवार
शरद पवार म्हणाले, “या कृषी कायद्यांवर खूप दिवस चर्चा सुरू होती. कृषी क्षेत्रात काही बदल करावे, गुंतवणुकीला वाव मिळावा, शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळावा, पिकाला उत्तम किंमत मिळावी याचा विचार केंद्र सरकारमध्ये होता. मी स्वतः कृषी मंत्री होतो. त्यावेळी माझ्याशी चर्चा झाल्या, त्यात कायद्यात बदल करण्याचीही चर्चा होती. पण हे निर्णय मंत्रिमंडळाने दिल्लीत बसून घ्यावेत या मताचा मी नव्हतो. घटनेने शेती विषय राज्याकडे दिलाय. म्हणूनच राज्य सरकारला विश्वासात घेऊन राज्याचे प्रतिनिधी, विविध कृषी विद्यापीठं, शेतकऱ्यांच्या संघटना यांना विश्वासात घेऊन विचार करावा असं आम्ही ठरवलं.”
निवडणुका जवळ आल्याने
कायदे केले रद्द : प्रियंका गांधी
प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणीव झाली आहे की कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात जाऊन देश चालवू शकत नाही”. पण ते हे का करत आहेत? निवडणुका जवळ येत असून ही परिस्थिती योग्य नाही अशी त्यांना जाणीव झाली असल्याचं देशवासियांनाही कळत असेल. सर्व्हेमध्ये परिस्थिती त्यांच्या बाजूने नाही असं स्पष्ट दिसत आहे. यामुळेच निवडणुकीच्या आधी ते माफी मागत आहेत,” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
राज्यात पुन्हा अवकाळी
पावसाची शक्यता
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचीही शक्यता आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रीय होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, गेले दोन दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण भागाज चांगला पाऊस झाला
गोखले ,कंगना ,गुप्ते यांनी देशाची माफी
मागावी अन्यथा आंदोलन : लक्ष्मण माने
सिनेअभिनेत्री कंगना रणौत हिने देशाला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्या विधानचे समर्थन केले. यानंतर गायक अवधूत गुप्ते यांनी देखील गोखले अभ्यासपूर्वक बोलतात म्हणत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आज पुण्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन तिघांच्या विधानाचा निषेध नोंदवला. तसेच येत्या ८ दिवसात या तिघांनी देशातील जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात विक्रम गोखले यांच्या घराबाहेर सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी नफ्यात आणण्यासाठी
खासगीकरणाचा पर्याय
संपाचा तिढा कायम आता असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
चेतन राऊतने कलाकृतींच्या
माध्यमातून केले १४ विश्वविक्रम
कला कोणतीही असो ती प्रत्येकाला आनंद देते. असाच आनंद चेतन राऊत या कलाकाराला त्याच्या कलाकृतींमधून मिळतो. चेतनने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी एक दोन नव्हे तर तब्बल १४ विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. सीडी, कॅसेट, कीबोर्डची बटणं, पणत्या यासारख्या आपण विचारही करू शकणार नाही अशा गोष्टींचा वापर करून चेतनने अनेक भन्नाट कलाकृती साकारल्या आहेत.
मी अर्धा भारतीय आहे, मला
त्याचा अभिमान : डिव्हिलियर्स
क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने आज क्रिकेटला अलविदा म्हटले. एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “मी आयुष्यभर आरसीबियन राहणार आहे. आरसीबीच्या सेटअपमध्ये प्रत्येकजण माझ्यासाठी एक कुटुंब बनला आहे. लोक येतात आणि जातात, पण आरसीबीची एकमेकांबद्दलची भावना आणि प्रेम नेहमीच राहील. मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.”
SD social media
9850 60 3590