‘ट्विटर’, ‘मेटा’नंतर आता अॅमेझॉनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही तिमाहींपासून कंपनीच्या तोट्यात वाढ होत असल्याने खर्चकपातीबरोबरच मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची शक्यता व्यक्त होत आहे. कंपनी या आठवड्यात जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून काढण्याची शक्यता असल्याचं वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलं आहे.
ऑनलाइन विक्री कंपनी असणाऱ्या अॅमेझॉनने १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यास कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल. जगभरात अॅमेझॉनचे १६ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारीसंख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे.
कर्मचारी कपात झाल्यास यामध्ये डिव्हाइस ग्रुपसह रिटेल आणि एचआर विभागाचा समावेश आहे. यामध्ये अॕलेक्सा वॉइस असिस्टंटची जबाबदारी असणाऱ्या कर्चमाऱ्यांचाही समावेश असू शकतो.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, अॅमेझॉनने तोट्यात असणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं आहे. ई-कॉमर्स कंपनीला सणांच्या दिवसातही मोठा तोटा सहन करावा लागला होता. एरव्ही नफा होणाऱ्या सणांमध्येही तोटा झाल्यानंतर काही आठवड्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे. किंमती वाढत असल्याने ग्राहक आणि व्यावसिकांकडे खर्चाकरता जास्त पैसै नसल्यानेच तोटा झाल्याचं कपंनीचं म्हणणं आहे.