बायडेन आणि जिनपिंग यांच्यात प्रथमच प्रत्यक्ष बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात सोमवारी बाली येथे प्रथमच प्रत्यक्ष बैठक झाली. हिंदू-प्रशांत क्षेत्र आणि तैवानमधील चीनच्या सक्तीच्या लष्करी कारवाईबाबतचे मतभेद दूर करण्याचे आणि द्विपक्षीय संघर्ष रोखण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. ‘जी – २०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बायडेन आणि जिनीपिंग यांच्यातील ही उच्चस्तरीय बैठक तीन तास चालली. दोन्ही नेत्यांनी उभे राहून परस्परांशी हस्तांदोलन केले आणि हसत हसत एकमेकांचे स्वागत केले.
बायडेन म्हणाले, की आपल्यातील वैयक्तिक संवाद सुरू ठेवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. दोन्ही देशांनी एकत्रितरित्या काही करावे यासाठी खूप मोठी संधी आहे. माझ्या मते, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या नेत्यांची जबाबदारी सामायिकच आहे. ते आपल्यातील मतभेद व्यवस्थित हाताळू शकतात आणि स्पर्धा, संघर्ष रोखू शकतात. परस्पर सहकार्याची आवश्यकता असलेल्या तातडीच्या जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्याचे मार्गही चीन आणि अमेरिका शोधू शकतात, अशी पुस्तीही बायडेन यांनी जोडली. संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या दोघांच्या चर्चेकडे आहे, असे जिनपिंग यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. सध्या चीन-अमेरिकेचे संबंध अशा स्थितीत आहेत की सर्वाना त्याबाबत चिंता आहे. कारण असे संबंध आपल्या दोन्ही देशांसाठी आणि त्यांच्या नागरिकांसाठी हिताचे नाहीत.