डेल्टा, ओमायक्रॉन या करोना विषाणूंना सक्षमरित्या तोंड देणारी प्रतिपिंड (अॅन्टिबॉडी) तयार करू शकणाऱ्या कोविड प्रतिबंधक भारतीय लशीची उंदरावरील चाचणी यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे या लशीला थंड वातावरणात ठेवण्याची गरज नाही. बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि जैवतंत्रज्ञान कंपनी मायनव्हॅक्स यांनी करोना विषाणूच्या काटेरी कवचाच्या ‘रिसेप्टर बांयंडिग डोमेन’ (आरबीडी) या प्रथिनांच्या काही भागाचा या लशीसाठी उपयोग केला आहे. या प्रथिनांमुळे विषाणूला शरीरातील पेशींमध्ये शिरकाव करता येतो. या लशीची चाचणी प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.
या लशीची चाचणी करणाऱ्या पथकात ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संशोधकांचा समावेश आहे. त्यांनी या लशीविषयीचे असे निरीक्षण नोंदवले, की ही लस ३७ अंश सेल्सियस तापमानात चार आठवडे म्हणजे सुमारे महिनाभर टिकते. १०० अंश तापमानतही ही लस सुमारे ९० मिनिटे प्रभावी राहते. ऑक्सफर्ड निर्मीत अॅस्ट्राझेनेका, भारतातील कोविशिल्ड या लशींना दोन ते आठ अंश सेल्सियस तापमानात ठेवावे लागते. फायझरच्या लशीला उणे ७० अंश सेल्सियस तापमानाची गरज असते.
उंदरावर या लशीचा प्रयोग केल्यानंतर डेल्टा, ओमायक्रॉन आदी करोना विषाणूवर तिचा काय परिणाम होतो, याचा उंदरांच्या रक्तनमुन्यांद्वारे अभ्यास केला गेला. त्यानुसार विविध प्रकारच्या करोना विषाणूंचा मुकाबला करण्याइतपत रोगप्रतिबंधक क्षमता उंदरांत निर्माण झाली होती. या लशीमुळे उंदरांत निर्माण झालेली प्रतिपिंडे डेल्टा आणि ओमायक्रॉन विषाणूंना निष्प्रभ करण्यात यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले