युक्रेनने रशियाच्या हद्दीत केलेल्या कथित हल्ल्यांमुळे आणि काळय़ा समुद्रात आपली आघाडीची युद्धनौका गमावल्यामुळे चिडलेल्या रशियाने किव्ह या युक्रेनच्या राजधानीच्या शहरावर नव्याने क्षेपणास्त्र हल्ले करण्याची धमकी दिली आहे. किव्ह शहराबाहेर ९०० हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पूर्व युक्रेनमध्ये नव्याने आक्रमणाची रशियन फौजांनी तयारी केली असून, हल्ल्यांचे लक्ष्य ठरलेल्या दक्षिणेकडील मारिओपोल या बंदराच्या शहरातही युद्ध सुरू आहे. या ठिकाणी रशियन फौजा मृतदेह खणून काढत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. ईशान्येकडील खारकिव्ह शहरात एका निवासी भागावरील तोफगोळय़ांच्या माऱ्यात ७ महिन्यांच्या एका मुलासह ७ जण ठार, तर ३४ जण जखमी झाल्याचे प्रांतिक गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले.
किव्हच्या पूर्वेकडील दार्निस्त्की डिस्ट्रिक्टवर हल्ला करण्यात आल्याचे महापौर विताली क्लिश्को यांनी ऑनलाइन पोस्टमध्ये सांगितले. किव्हभोवतीच्या शहरांमध्ये, मृतदेह रस्त्यांवर सोडून देण्यात आले किंवा त्यांचे तात्पुरते दफन करण्यात आले, अशी माहिती प्रांतिक पोलीस दलाचे प्रमुख अँद्री नेबितोव्ह यांनी दिली. यापैकी ९५ टक्के लोक बंदुकीच्या गोळय़ांनी मरण पावल्याचे त्यांनी पोलिसांच्या आकडेवारीचा हवाला देऊन सांगितले.
‘रशियाच्या ताब्यात असलेल्या भागात लोकांना रस्त्यांवरच मृत्युदंड देण्यात आल्याची आमची माहिती आहे’, असे ते म्हणाले. दररोज आणखी मृतदेह ढिगाऱ्यांखाली व सामूहिक थडग्यांमध्ये सापडत असून, त्यांची सगळय़ात जास्त, म्हणजे ३५० इतकी संख्या बुचा येथे असल्याचे नेबितोव्ह यांनी सांगितले. त्यांच्या मते, किव्हची उपनगरे रशियाच्या ताब्यात असताना कामगारांनी मृतदेह गोळा करून ते पुरले.
दक्षिणेकडील खेरसन व झापोरिझिझिआ प्रदेशांच्या काही भागांवर नियंत्रण असलेल्या रशियन फौजा नागरिकांना धमकावत असून, युक्रेनच्या लष्करात किंवा सरकारात काम केलेल्या लोकांचा शोध घेत आहेत, असा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला.