राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे निधन

राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक यांचे निधन झाले. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हाजी गफ्फार मलिक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातील संयत नेतृत्व हरपले, अशी भावना व्यक्त केली. हाजी मलिक हे शरद पवारांचे विश्वासू आणि निष्ठावान सहकारी म्हणून प्रसिद्ध होते.

जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. या वृत्ताने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हाजी गफ्फार मलिक यांच्या दुःखद निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यांच्या मृत्यूबाबत सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रावेर विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला होता.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्षवाढी करीता त्यांनी परिश्रम घेतले होते. राष्ट्रवादीचे
सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मलिक यांना अनेक पक्षातून बोलावणं आलं होतं. मात्र त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत निष्ठा राखली.

शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्य प्रमुख डॉ. हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन आणि इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.