हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे प्रत्येक शहरातलं एक धगधगतं ठिकाण असतं. औरंगाबादच्या क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हादेखील शहराच्या जडणघडणीतल्या प्रत्येक स्थित्यंतराचा साक्षीदार ठरला. विकासकामांमध्ये क्रांतिचौकात झालेल्या उड्डाणपुलासमोर पुतळ्याची उंची कमी जाणवत होती. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवण्याचा मुद्दा समोर आला. अनेक मंजुरींनंतर त्यावर काम सुरु झाले होते. आता मात्र पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. क्रांति चौकात भव्य चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा उभा केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात घडवल्या जाणाऱ्या या पुतळ्याच्या कामाला भेट दिली. हे काम किती टक्के पूर्ण झाले आहे, यासंदर्भात नुकतेच मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.
क्रांती चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची 21 फूट असून त्याची लांबी 22 फूट अशी असेल. चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट असेल. हा पुतळा 6 टन वजनाचा असेल. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल. अतिशय रेखीव अशा या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच पुतळ्याभोवती उभारल्या जाणाऱ्या चबुतऱ्याचेही काम पूर्णत्वाकडे जात आहे.
क्रांती चौकातील हा पुतळा घडवण्याचे काम पुण्यातील धायरी येथील चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ येथे होत आहे. चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांचे सहकारी हा भव्य पुतळा साकारत आहे. औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यातील या स्टुडिओला काही दिवसांपूर्वी भेट दिली. यावेळी हा पुतळा म्हणजे देशात एक आदर्श शिवपुतळा ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या भेटीत आमदार अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता पानझडे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे उपस्थित होते. या पुतळ्यासाठी अंदाजे 2.82 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
औरंगाबादमधील क्रांती चौकातील जुना पुतळा 38 वर्षांपूर्वी म्हणजेच1983 च्या काळात उभारण्यात आला होता. शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे तत्त्व पाळणारे होते. त्यामुळे भावी पिढीला त्यांचा आदर्श रहावा, या उद्देशाने पुतळा क्रांतिचौकात उभे करण्याचे ठरवण्यात आले. जुन्या पुतळ्यासाठीही शहरवासियांनी 21 वर्षे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष अलफखाँ यांच्या अध्यक्षतेखाली अश्वारुढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या वतीने तो उभारण्यात आला. शिवरायांचा जुना पुतळा उंची 15 फूट आणि 5 फूट लांब असा होता. तत्कालीन शिल्पकार एस. डी. साठे यांनी तो पुतळा मुंबईत तयार केला होता.