मराठी माणसाला नागराजनं वेगळा सिनेमा पहाण्याचं वेड लावलंय. फँड्री, सैराटनंतर आता झूंड कुठल्या पातळीवर घेऊन जाणार याची उत्सुकता सिनेप्रेमींना आहे. त्यासाठीच झूंडची प्रतिक्षा संपलीय आणि आजपासून तो तुमच्या जवळच्या थेटरात पहायला मिळणार आहे.
झूंड हा फूटबॉलबद्दल असल्याचं सगळे जण म्हणतायत पण मी म्हणतो हा त्यातल्या माणसांबद्दल आहे. नागराज मंजुळेंचं हे वक्तव्य सिनेमाची गोष्ट एका वाक्यात सांगण्यासाठी पुरेसं आहे. सिनेमा हा सत्यकथेवर आधारीत आहे. नागपूरातल्या विजय बारसे यांनी झोपडपट्टीतल्या काही मुलांना घेऊन जो चमत्कार घडवण्याचा प्रयत्न केला त्याचा सिनेमा आहे झूंड. अमिताभ बच्चन यांचं सर्वाधिक सिनेमात नाव कुठलं असेल तर ते आहे विजय.
विशेष म्हणजे नागराजच्या झूंडमध्येही अमिताभ बच्चन विजय म्हणूनच पडद्यावर येतायत. त्यामुळे प्रेक्षकांना विजयशी स्वत:ला जुळवून घेणं नवं वाटणार नाही. मागच्या कडीची ही पुढची गोष्ट असेल. बिग बींच्या खांद्यावर हा सिनेमा उभा असला तरी खुद्द नागराज काय दाखवणार याचीही तेवढीच उत्सुकता आहे. फँड्री, सैराटनं जी दुनिया दाखवली, जग शोधलं, तसच काही वेगळं, जगा वेगळं पहायला मिळावं ह्या अपेक्षेनं प्रेक्षक सिनेमागृहात जाणार आहे. त्याची निराशा होणार नाही याची जबाबदारी नागराजची आहे. बिग बींची आहे. विशेष म्हणजे नागराजचा सिनेमा यशस्वी व्हावा अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यासाठी ते स्वत:चा खिसा रिकामा करायला तयार आहेत.
दोन दिवसांपासून झूंडवरच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्यात. काही जणांनी सिनेमाचं परिक्षण केलंय. काही खास शोजचं त्यासाठी आयोजन केलं गेलं होतं. बहुतांश जणांनी पाच पैकी सिनेमाला साडे तीन ते चार पॉईंट दिलेले आहेत. त्यामुळे प्रोड्युसरच्या डोक्यावरचं ओझं काहीसं कमी झालं असणार. हा सिनेमा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि तो आहे आमीर खानच्या प्रतिक्रियेनं. त्याच्यासाठी स्पेशल शोचं आयोजन केलं गेलं होतं.
प्रतिक्रिया देताना आमीर प्रचंड भारावून गेल्याचं दिसलं. गेल्या पंचवीस तीस वर्षात आम्ही जे काही केलं, त्याचा नागराजनं फुटबॉल केला असं आमीर म्हणाला. त्याचे डोळे पानावलेले दिसले. विशेष म्हणजे आमीरनं झूंडमधल्या झूंडीचही तोंडभरुन कौतूक केलंय. आमीर सहसा असा बोलणारा नाही त्यामुळे त्याची प्रतिक्रिया खास चर्चेत आहे. अशाच एका शोचं आयोजन साऊथ सुपरस्टार धनुषसाठीही केलं गेलं. तोही झूंड मास्टरपीस असल्याचा म्हणालाय.
बॉलीवुडच्या दिग्गज मंडळींनीही झूंड ऑलरेडी बघितलाय. त्यात अनुराग कश्यप म्हणतो, गेल्या काही काळातली ही बेस्ट फिल्म आहे. सिनेमागृहात पागलपण होईल. वर्षभर तरी फिल्म उतरणार नाही. काही जण म्हणालेत ही मास्टरपीस आहे, काही जण ग्रेट फिल्म म्हणतायत, काही डायरेक्टर्सनी तर आतापासूनच झूंडला ऑस्करला पाठवा म्हणतायत