रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. युद्धाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. गुरुवारी कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली ही गेल्या आठ वर्षांमधील सर्वोच्च वाढ आहे. दरम्यान दुसरीकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाच्या मुल्ल्यात देखील चढउतार पहायला मिळत आहे.
रुपयाच्या मुल्यामध्ये होणारी घसरण थांबवण्यासाठी आता भारताची मध्यवर्ती बँक असलेली आरबीआय (RBI) काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्याच्या तयारीत आहे. एकीकडे रुपयांचे मुल्य घसरत आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. याचा ताण हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडत असून, परिणामी विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 9 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. बाजारात तणावाचे वातावरण आहे. तसेच रुपयांचे मुल्य देखील डॉलरच्या तुलनेमध्ये घटताना दिसत आहे. भारत कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. एकीकडे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे भारतीय चलन असलेल्या रुपयाच्या मुल्ल्यात घसरण होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयकडून काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दबाव निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती तर भडकल्या आहेतच सोबतच खाद्य तेलाच्या किमतीमध्ये देखील तेजी दिसून येत आहे. भारत जवळपास 80 टक्के कच्चे तेल तर 65 टक्के खाद्य तेल इतर देशांकडून आयात करतो. हा सर्व व्यवहार डॉलरमध्ये होतो. अशा स्थितीत जर रुपयाचे मुल्य घसरले तर त्याचा मोठा फटका देशाला बसू शकतो.