आज दि.१७ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण देण्याच्या
निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती रद्द

हरियाणातील राज्य नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना ७५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावरील उच्च न्यायालयाची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना उच्च न्यायालयाला महिनाभरात या प्रकरणी अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे सांगितले. याआधी राज्य सरकारने स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 बंगले नावावर
करण्यासाठी पत्र लिहिले : किरीट सोमय्या

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी अद्यापही सुरुच आहेत. संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिल्यानंतर किरीट सोमय्यांनी आता रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला शेअर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे १९ बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलं होतं असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी (आणि मे) २०१९ मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिले असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये लिहिलं असून सोबत पत्राची प्रत जोडली आहे.

भारतात हिजाब घालण्याची
गरजच नाही : साध्वी प्रज्ञासिंह

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नुकत्याच केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या भाजपा खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भारतात हिजाब घालण्याची गरजच नाही, असं म्हटलं आहे.
एबीपी लाईव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिजाब प्रकरणावर केलेल्या विधानावरून वाद सुरू झाला आहे. “हिंदू सनातनी परंपरा मानतात. हिंदू धर्मात महिलेला देवीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे हिंदू महिला सुरक्षित असतात”, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच, शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेलं चालणार नाही, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

बायकांना शिस्त लावण्यासाठी
नवऱ्याने तिला मारायला हवं

मलेशियातील एका महिला केंद्रीय मंत्र्यानं केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नवऱ्यांनी त्यांच्या हट्टी बायकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याशी आधी बोललं पाहिजे. त्यानंतरही त्यांनी वर्तन सुधारलं नाही, तर नवऱ्यांनी तीन दिवस बायकांपासून वेगळं झोपावं. मात्र, त्यानंतर देखील पत्नीमध्ये कोणताही बदल न दिसल्यास नवऱ्याने तिला सावकाशपणे मारायला हवं. यातून आपण किती कडक शिस्तीचे आहोत आणि बायकोमध्ये बदल करण्यासाठी आपण किती आग्रही आहोत, हे दिसून येईल”, असं सिती मोहम्मद युसूफ या व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.

हिंदुस्थानी भाऊ विकास
पाठकला जामीन मंजूर

सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकला मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील (Dharavi) हिंसक आंदोलन प्रकरणी हा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने विकास पाठकला जामीन मंजूर केला आहे. हिंदुस्थानी भाऊला धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर आंदोलन केलं होतं.

वॉरन बफे यांनी बिटकॉइनमध्ये
गुंतवले एक अब्ज डॉलर्स

क्रिप्टो बूमने आतापर्यंतच्या महान गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या वॉरन बफे यांना त्यांच्या शब्दांवरून परत फिरण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. कारण, बिटकॉइनला विष म्हणणाऱ्या वॉरन बफे यांनी संबंधित बँकेत तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. बर्कशायर हॅथवेने २०१८ च्या वार्षिक शेअरहोल्डर मीटिंगमध्ये बिटकॉइनला विष म्हणून संबोधल्यानंतर, बफे यांनी स्पष्टपणे यू-टर्न घेतला आहे.

हळदीच्या कार्यक्रमावेळी महिला
विहिरीत पडल्या, 11 जणींचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या सुमारास 13 महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत सुमारे 11 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही दुर्देवी घटना घडली. नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

गोवा राज्यातील लसीकरण
लवकरच केंद्र बंद होणार

गोवा राज्यातील लसीकरण केंद्र बंद होणार आहेत. कारण गोव्याने पहिला नंबर पटकावला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य गोवा ठरलं आहे. गोव्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 11.66 लाख नागरिकांना लसीकरण करण्याात आलंय.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.