बुधवारी मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंनी तर बीकेसी मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. या दोन्ही मेळाव्यांवर मनसेकडून आलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदे सरकारवर विरोधकांकडून खोके सरकार असे आरोप वारंवार केले जात आहेत, पण मनसेकडून मात्र पहिल्यांदाच खोके या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या बस पार्क करण्यात आल्या, तसंच कार्यकर्त्यांच्या खान-पानाची सोय करण्यात आली, यावरून मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
‘बीकेसी मैदानावर अनेक राजकीय सभा झाल्या. अगदी पंतप्रधानांचीही झाली.पण सभेसाठीच्या बसेस आजवर कुणी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पार्क केल्या नाहीत, गर्दीच्या खान-पानाची सोय केली नाही.
पार्किंगच्या या अशैक्षणिक सेवेसाठी शिंदेशाहीने विद्यापीठाला किती ‘खोके’ शुल्क दिले?’, असा सवाल अखिल चित्रे यांनी विचारला आहे.
दसरा मेळाव्याच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी लगेचच ट्वीट करून प्रतिक्रिया दिली. नुसतीच “उणी”धुणी” “नळ”आणि”भांडण”विचार ही नाही आणि सोन ही नाही, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं. तर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही भाषण करायला राज ठाकरेच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिली. राजू पाटील यांनीही त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये खोके हा हॅशटॅग वापरला आहे.