मुंबई वाचक प्रेरणा दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांचा संग्रहाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या धर्माविषयी असलेल्या भावनेवर भाष्य केलं. तसेच आपल्या आजोबांनी लावलेले विचारांचे बीज आज मोठे वटवृक्ष झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा, पण घराबाहेर पडताना आपला देश हाच एक धर्म असला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“प्रत्येकाला धर्म आहे. पण माणूस आधी माणूस म्हणून जन्माला येतो. त्यानंतर जात-पात धर्म त्याला चिपकवली जातात. मग काय करायचं? नास्तिकच व्हायचं का? नाही, अजिबात नाही. तुम्ही धर्म जरुर पाळा. धर्माचं पालन जरुर करा. पण तो सर्व अभिमान आपापल्या घरात ठेवा. घराबाहेर पडताना हा देश माझाच धर्म हीच धारणा असली पाहिजे. ही भावना घेऊन घराबाहेर पडल्यानंतर कुणी त्याच्या धर्माची मस्ती होऊन माझ्यासोबत उभा राहिला तर मग मला एक कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आयुष्यातील अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितली. त्यातून आमची जडणघडण झाली. कालच दसरा झालेला आहे. मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे. ते बोलताना हेही मी सांगितलंय, हे जे शब्दांचे धन आहे, प्रबो’धन’ ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला बोलण्याचं धाडस, कारण लोकशाहीत मत लागतं, त्यासोबत धाडसही लागतं. मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे.
तुम्ही म्हणाल हे शंभर वर्षांपूर्वीचं जुनं आहे, आता काय करायचं? त्याचं महत्त्व काय? पण तसं नाहीय. महत्त्व असेल-नसेल. हे बघणाऱ्यावर आहे. शंभर वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे त्यातून कळतं. पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रुढी-परंपरा होत्या, त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलंय, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे. मी साहित्यिक वगैरे नाही. जे काही आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो. त्यांच्या पोथ्या पाण्यात टाकल्या होत्या. पण त्या परत पाण्यावर तरंगल्या होत्या. मला तोच क्षण आता वाटतोय. कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत. या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्या आहेत.